मित्रांनो!, गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर अतिशय गाजणारी आणि रसिक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेली १३ वर्षे सातत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने मालिका सोडली. त्यानंतर अभिनेत्री सुनैना फौजदार अंजली भाभीची भूमिका साकारत आहे.

आता नेहा पाठोपाठ आणखी एक अभिनेत्री ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. आता मालिकेतील रोशन सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सिवाला ही मालिका सोडणार असल्याचे म्हटले जात आहे. जेनिफर ही प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

या सर्व चर्चा सुरु असताना जेनिफरने एका सुप्रसिद्ध वृत्तावाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये वक्तव्य करत तिने सर्व चर्चांना स्पष्टपणे पूर्णविराम दिला आहे. ‘मी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे मला अनेकांनी फोन आणि मेसेज केले आहेत. तसेच मी प्रेग्नंट असल्यामुळे मालिका सोडत असल्याचे देखील म्हटले जात आहे. पण या सर्व अफवा आहेत’ असे जेनिफर म्हणाली. पुढे ती म्हणाली की, ‘मला गेल्या काही दिवसांपासून बरं वाटत नाही. माझ्या पायाला दुखापत झाली आहे. मला चालता देखील येत नाही. त्यामुळे मी दमणला चित्रीकरणासाठी जाऊ शकले नाही. मी मालिकेच्या टीमच्या संपर्कात असते. पण लोक अशा अफवा का पसरवतात मला कळत नाही.’

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत आहेत. घनश्याम यांचा मुलगा विकासने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. तीन महिन्यांपूर्वी घनश्याम यांच्यावर उपचार सुरु होते. तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती. पण आता डॉक्टर पुन्हा त्यांच्यावर उपचार करत असल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले आहे.

सप्टेंबर २०२० मध्ये ७७ वर्षीय घनश्याम यांना कर्करोग झाल्याचे कळाले होते. त्यानंतर त्यांची सर्जरी झाली होती. घनश्याम यांचा मुलगा विकासने दिलेल्या माहितीनुसार, “घनश्याम यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण आम्हाला कोणती रिस्क घ्यायची नाही. म्हणून आम्ही त्यांची केमोथेरपी सुरु केली आहे. घनश्याम यांच्यावर आधी उपचार केलेले डॉक्टरच पुन्हा उपचार करत आहेत. तसेच त्यांना त्याच रुग्णालयात दाखल केले आहे.”