तांडव’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित ! तांडव..हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर शिवाजींची प्रतिमा उभी राहते. याच नावाचा अभिषेक प्रोडक्शन प्रस्तुत, सुभाष गणपतराव काकडे निर्मित, संतोष चिमाजी जाधव दिग्दर्शित ‘तांडव’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या मराठी सिनेमाचे मोशन पोस्टर अरूण नलावडे यांच्या हस्ते मुंबईत प्रदर्शित करण्यात आले.

एकटी मुलगी काय करू शकते हे यशस्वीपणे दर्शवणाऱ्या या सिनेमात मुख्य नायिका पूजा रायबागी असून तिच्या सोबत मराठीतली मातब्बर मंडळी अरुण नलावडे, सयाजी शिंदे आहेत. सोबत निल राजुरीकर, आशिष वारंग यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. आजवर नायक पोलीस अधिकारी असलेले सिनेमे आपण खूप पाहिले आहेत, परंतु मराठीत पहिल्यांदाच नायिका पोलीस अधिकारी असलेला आणि जबरदस्त ऍक्शन असलेला असा हा सिनेमा आहे.

दिग्दर्शक संतोष जाधव सांगतात की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे, जेंव्हा समाजात घडत असलेला अन्याय, अत्याचार निचतेची परिसीमा गाठतो तेंव्हा निर्माण होते ते तांडव, प्रत्येक मुलीला प्रेरणादायी ठरेल असा आमचा विश्वास आहे. प्रत्येक महिलेला या सिनेमाच्या गोष्टीतून ऊर्जा, जिद्द, बळ मिळेल हाच आमच्या सिनेमाचा हेतू आहे. चित्रपटाची पटकथा संवाद प्रशांत निगडे यांचे आहे. त्याचबरोबर रोहन पाटील, अशोक काजळे आणि नविन मोरे यांचे संगीत आहे तर विजय गवंडे यांचे पार्श्वसंगीत आहे.