H2O कहाणी थेंबाची’मधून शीतल अहिरराव करणार जनजागृती ‘वॉक तुरु तुरु’, ल’ई भारी पोरी’, ‘इश्काचा किडा’, ‘हंगामा’, ‘दिवाणा तुझा’ या म्युझिक अल्बम्समधून शिवाय ‘जलसा’, ‘मोल यांसारख्या चित्रपटांतून दिसणारा प्रॉमिसिंग चेहेरा म्हणजेच शीतल अहिरराव. मराठी चित्रपटसृष्टीत चमकू पाहणारा हा उभारता तारा सध्या महोत्सवांत गाजणाऱ्या ‘H2O कहाणी थेंबाची’ या आगामी मराठी चित्रपटात दिसणार आहे. आपल्या पदार्पणातच प्रेक्षकांची मने जिंकणारी शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ या चित्रपटात समाजप्रबोधन करताना दिसेल शिवाय ‘व्हीआयपी गाढव’, ‘फक्त एकदाच’, ‘होरा’ आणि ‘सलमान सोसायटी’ हे शीतलचे आगामी चित्रपट असून लवकरच या ही चित्रपटांतून शीतल निरनिराळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

पर्यावरणचा ढासळता समतोल अनेक संकटांना आमंत्रित करीत आहे. विकासाच्या हव्यासापायी केलेली अमानवी प्रगती भविष्यकाळात भीषण वास्तव घेऊन आपल्यासमोर उभी राहणार आहे. अशाच एक गंभीर विषयावर भाष्य करणारा मौलिक मराठी चित्रपट म्हणजे जी. एस. प्रोडक्शन प्रस्तुत सुनील झवर निर्मित आणि मिलिंद पाटील दिग्दर्शित ‘H2O कहाणी थेंबाची’ १२ एप्रिलपासून आपल्या भेटीस येणार आहे

मूळची नाशिकची शीतल ‘H2O कहाणी थेंबाची’ चित्रपटाविषयी बोलताना सांगते, ‘H2O’ चित्रपटाची स्क्रिप्ट अतिशय उत्तमरीत्या मांडली होती. स्क्रिप्ट वाचताच माझ्या अंगावर शहारेच उमटले. आपण जर पर्यावरणाचा असाच ऱ्हास करीत राहिलो तर भविष्यकाळ बिकट असल्याचे मला जाणवलं. मी क्षणाचाही विलंब न करता हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटाच्यानिमित्ताने माझ्या हातून समाजप्रबोधन घडेल जे माझ्यासाठी अधिक महत्तवाचं आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक गोष्टी मला उमगल्या खूप काही शिकायला मिळाले. या प्रवासात मला खूप छान अनुभव घेता आले. या अनुभवाची ठेव आयुष्यभर माझं जगणं समृध्द करणारी आहे.

‘H2O’ चित्रपटात सियाची मध्यवर्ती भूमिका साकारणारी शीतल अहिरराव आपल्या आगामी कारकिर्दीत एका हिंदी मालिकेतही झळकणार आहे. या मालिकेची घोषणा लवकरच होणार असून ‘सरस्वती’ असं या मालिकेचं नाव आहे. शीतलचा अभिनय क्षेत्रातील प्रवास विविधतेने नटलेला असून शीतल आपल्या कामाविषयी प्रचंड जागरूक आहे. एक कलाकार म्हणून आपणही समाजाचे काही ना काही देणं लागतो ह्याची तिला पुरेपूर जाण असल्यामुळे तिने ‘H2O’ सारखा गंभीर विषय निवडला. तिच्या प्रयत्नांना रसिकांच्या पसंतीची पावती नक्कीच मिळेल ह्यात काही शंका नाही.