‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, प्रेक्षकांसाठी नेहमी निरनिराळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. २०१८ या वर्षात सुरु झालेली ‘वर्तुळ’ ही मालिका यापैकीच एक आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारीअभिनेत्री जुई गडकरी, हिच्याकडे एकूण ८ पाळीव प्राणी आहेत. ४ पर्शियन मांजरी व एक हिमालयन मांजर अशा पाच मांजरी जुईने पाळलेल्या आहेत. छकुली, बंडू, बच्चू, चिंगू, मुन्ना अशी या मांजरीची नावेसुद्धा फार निराळी आहेत. जुईचा मांजरींवर जास्त जीव असला, तरीही तिचं श्वानप्रेमदेखील कमी नाही. या मांजरीच्या सोबतीला, बाबा, माऊ आणि बुट्टू हे तीन कुत्रे सुद्धा आहेत. कामाचा दिवसभराचा ताणहलका व्हावा, यासाठी जुई तिच्या या मुलांसोबत वेळ घालवणे पसंत करते. ती आपल्या या पाळलेल्या प्राण्यांना पोटच्या मुलांसारखं मानते, म्हणूनच त्यांची नावं सुद्धा, तिने लहानग्यांच्या टोपण नावांसारखीठेवली आहेत. दिवसभराचा सारा थकवा, त्यांच्या सोबतीने पळून जात असल्याचं ती आवर्जून सांगते.

जुई २-३ महिन्यांची असताना, तिला मांजरीचा लळा लागला. हे प्राणीप्रेम कायम वाढतच गेलं. त्यामुळेच आज तिच्याकडील सगळ्या पाळीव प्राण्यांची ती आई झालेली आहे. प्राणीप्रेमाचा हा वारसा, तिला तिच्यापालकांकडून मिळाला आहे. घरातील सगळ्यांनाच प्राण्यांविषयी आपुलकी व प्रेम असल्याने, जुई शूटसाठी घराबाहेर असतांनाही या प्राण्यांची छान काळजी घेतली जाते. हे पाळीव प्राणी एकत्र खेळतात, मस्तीकरतात, कधी एकमेकांच्यात भांडतात; त्यांच्यातील हे बंध अगदी ‘टॉम अँड जेरी’सारखे आहेत. जुईसाठी ही सारीच मंडळी फार प्रिय आहेत.

तिच्या या पाळीव प्राण्यांविषयी बोलताना जुई म्हणते; “हे आठही जण माझ्यासाठी माझ्या मुलांसारखे आहेत. शूटिंगहुन परत येत असताना, मुले माझी घरी वाट बघत आहेत, असं मला वाटत असतं. माझ्या आईबाबांप्रमाणेच मलाही प्राणी खूप आवडतात.त्यांच्यातील जिव्हाळा अगदी ‘टॉम अँड जेरी’सारखाच आहे. दिवसभराचा शिणवठा घालवण्यासाठी मी त्यांच्यासोबत वेळ घालवते.”