क्षमा देशपांडे हिने ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर आपल्या उत्तम नृत्यकलेची छाप पाडली आहे. तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. या स्पर्धेतील आव्हान आणि तिला मिळत असलेली प्रसिद्धी याविषयी तिच्याशी गप्पा मारल्या असता, तिने अनेक अनुभव शेअर केले.
१. ‘युवा डान्सिंग क्वीन’मधील कोणता स्पर्धक तुला सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो?
गिरीजा प्रभू आणि पूर्वा शिंदे या माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. माझ्यासमोर या दोघींचे आव्हान खूप मोठे आहे. निखळ मैत्री आणि एकमेकींशी असलेली मैत्रीपूर्ण स्पर्धा असा दुहेरी अनुभव सध्या आम्ही घेत आहोत. मैत्रीण म्हणून या दोघी जितक्या जवळच्या आहेत, तितकेच मोठे आव्हान या दोघींनी उभे केले आहे.
बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, आमची ही चुरशीची स्पर्धा ‘झी युवा’ वाहिनीवर पाहता येईल.
२. अमृता आणि मयूर यांच्यापैकी तुझा फेवरेट परीक्षक कोण आहे?
दोघेही परीक्षक माझे लाडके आहेत. त्या दोघांच्यात तुलना होणे अशक्य आहे. स्पर्धकांच्या सादरीकरणाबद्दल कधी कधी त्यांचे एकमत झालेले पाहायला मिळते, तर काहीवेळा त्यांची मते वेगवेगळी असतात. दोघांचा दृष्टिकोन निराळा असला, तरीही त्यातून खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे दोघेही माझ्यासाठी फेवरेटच आहेत.
३. तुझ्या परफॉर्मन्सबद्दल चाहत्यांच्या प्रतिक्रिया तुला मिळत असतील; त्याविषयी आम्हाला काय सांगशील?
मी शास्त्रीय नृत्य शिकलेली आहे. ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या निमित्ताने मला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स फॉर्म्स सादर करण्याची संधी मिळाली आहे. माझे सादरीकरण लोकांना आवडते आहे याचा मला खूप आनंद आहे. या मंचावर खूप गोष्टी शिकायला सुद्धा मिळत आहेत. मला चार्ली चॅप्लिन म्हणून प्रेक्षकांनी पहिले आहे. माझा ‘वॉटर ऍक्ट’, आणि ‘बाबा’ या गाण्यांवरील परफॉर्मन्स लोकांना अतिशय आवडला आहे. आजही त्याबद्दल मला प्रतिक्रिया येत असतात. माझ्या नृत्याच्या माध्यमातून मला प्रेक्षकांशी कनेक्ट होता येतं, याचं खूप समाधान मिळतं.
४. कोरिओग्राफरसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
ओंकार दादासोबत माझं खूप छान नातं आहे. गुरुशिष्याच्या नात्यापलीकडे जाऊन, एक माणूस म्हणून सुद्धा तो मला खूप आवडतो. तो सगळ्यांची खूप काळजी घेतो. प्रोफेशनल आणि भावनिक अशा दोन्ही स्तरांवर तो आणि त्याची टीम खूप छान मदत करते. त्यांच्याकडून आम्ही खूप गोष्टी शिकतोय, खूप अनुभव घेतोय. उत्तम कोरिओग्राफर आणि एक चांगला मित्र अशा दोन्ही भूमिकांमध्ये ओंकारदादाशी छान नाते आहे.
५. शूटिंगदरम्यानचा एखादा किस्सा आम्हाला सांगशील का?
अनेक अविस्मरणीय किस्से मंचावर घडले आहेत.
एखादा भावनिक किस्सा सांगायचा झाला, तर ‘बाबा’ या गाण्यावरील परफॉर्मन्सच्यावेळी घडलेला किस्सा आठवतोय. प्रेक्षक, परीक्षक आणि मी स्वतः सुद्धा हे गाणे ऐकत असताना भावनिक झाले होते. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ओंकार दादा आणि त्याच्या टीमच्या सपोर्टमुळे मी उत्तम सादरीकरण करू शकले.
असाच एक विनोदी किस्सा सुद्धा मी शेअर करू शकते. चार्ली चॅप्लिनवर आधारित नृत्य सादर करायचं होतं, म्हणून त्यापद्धतीने चालायची प्रॅक्टिस मी करत होते. लेसमध्ये पाय अडकून मी अचानक पडले आणि सगळ्यांनाच हसायला एक मोठं कारण मिळालं. मी स्वतःदेखील माझ्या या वेडेपणावर खूप हसत होते.