सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी लढत आहे. सगळ्यांच्या दैनंदिन जीवनावर या संकटाचा परिणाम झालेला दिसून येतोय. हा व्हायरस पसरू नये म्हणून सरकारने अनेक ठोस निर्णय घेतले. मराठी मनोरंजन सृष्टीवर सुद्धा याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले आहे. मालिकांचे शूटिंग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या बरोबरीनेच, स्वतःसाठी व कुटुंबासाठी वेळ काढण्याचा निर्णय अनेक कलाकारांनी घेतलेला आहे. ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणारा अभिनेता देवदत्त नागे, याने तर त्याचा ‘फुलप्रूफ प्लॅन’ तयार केला असल्याचं कळतंय. तर या क्वारंटाइनवर हा आहे डॉक्टर डॉनचा इलाज.
देवदत्तला बॉडीबिल्डिंगची आणि बाईक्सची खूप आवड असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मार्चअखेरपर्यंत मिळालेल्या या सुट्टीमध्ये तो, या दोन्ही गोष्टींकडे अधिक लक्ष देणार असल्याचं समजतंय. शरीर कमावण्याबद्दलची अधिक माहिती, सोशल मीडिया आणि पुस्तकांचा पुरेपूर वापर करून तो मिळवणार आहे. वर्कआऊट संदर्भातील पुस्तके वाचणे, अरनॉल्ड, रॉकसारख्या जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर्सचे युट्युब व्हिडीओज पाहणे यात तो त्याचा वेळ घालवणार आहे. सूर्यनमस्कारासारखे सर्वांगसुंदर भारतीय व्यायामप्रकार तो या दिवसांमध्ये करणार आहे.
अर्थात, युट्युबचा वापर तो केवळ या विषयावरील विडिओ बघण्यासाठी करणार नसून, त्या माध्यमातून चित्रीकरण आणि एडिटिंगविषयी अधिक माहिती मिळवण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न असणार आहे. बाईक्सची खूप आवड असलेला देवदत्त ट्रॅव्हलवर आधारित युट्युब चॅनेल्स सुद्धा बघणार असल्याचे समजते.
याशिवाय त्याच्याकडे असलेल्या बाईक्सची काळजी घेण्यासाठी तो वेळ काढणार आहे. कुटुंबाला सुद्धा प्राधान्य देऊन, त्यांच्यासोबत वेळ घालवता यावा असा सुद्धा देवदत्तचा प्रयत्न असेल. घरच्या कामामध्ये जबाबदारी उचलणे, नव्या पाककृती शिकण्याचा प्रयत्न करणे अशा इतरही अनेक गोष्टी देवदत्त करणार आहे.