मित्रांनो!, नुकताच दोन दिवसांपूर्वी अक्षय बोऱ्हाडे या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यामध्ये हा तरुण दावा करत आहे की, मागील काही वर्षांपासून शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी तो काम करतो. व्हायरल व्हिडिओत हा तरुण म्हणतोय “गेल्या ३ वर्षापासून मी छत्रपती शिवरायांच्या विचाराने समाजाची सेवा करत आहे.

निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचे त्यांना न्याय देण्याचे काम केले, कधीही स्वत:चा विचार केला नाही. माझे कुटुंबदेखील माझ्यासोबत काम करत आहे. काही राजकीय मंडळींनी मला त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली. मला बंदूक दाखवून त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, मोबाईल काढून घेतला. तसेच माझा व्हिडीओ काढून पैसे घेतल्याचं बतावणी करण्यात आली.

पैशाच्या जोरावर मला मारहाण केली. मी केलेले आरोप खोटे असेल असे वाटत असेल तर चेअरमनच्या बंगल्यावरील सीसीटीव्ही चेक करा, त्याच्यापुढे जाणाऱ्या माणसांना मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला आहे.” परंतु याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दुसरी बाजू पडताळण्याची गरज असल्याचे म्हटले आणि सत्यशील शेरकर यांनी आपली बाजू मांडताना, मारहाणीचे सर्व आरोप फेटाळले.

दरम्यान याप्रकरणी भाजप खासदार उदयनराजे भोसेले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी अक्षयला आधार दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही फेसबुक पोस्ट लिहून, अक्षय तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे, असे म्हटले आहे. घरातील गरिबीची तमा न बाळगता समाजाची सेवा झोकून देऊन करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे या मुलावर अत्याचार झाल्याची बातमी मनाला वेदना देऊन गेली.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आदर्श मानून त्याने कार्य सुरू ठेवले आहे. या मुलाच्या कार्याची दखल घेत, पुरंदर किल्ल्यावर शंभु जयंती ला माझ्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. अशा प्रामाणिक शिवभक्ताला एका सत्तांध व्यक्तीकडून मारहाण होते, त्यांनतर त्याला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी मिळते. हे अत्यंत चुकीचे आहे. पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

संपूर्ण घटनेचा छडा लावून आरोपी ला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे, कुणा पक्षाचा, कुणा जातीचा, कारखानदाराचा किंवा मोठ्या घरचा म्हणून का मुलाहिजा ठेवावा? तसेच, अक्षयला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचनाही केल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. त्यानंतर सत्यशील शेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू पाहतांना याच सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अक्षयची पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जुन्नरचे माजी नगरसेवक आणि शहा एचपी गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता आणि शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली होती.

हे प्रकरण ताजं असतानाच आता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणी वाढवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अक्षयची पत्नी रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अक्षय, त्याची आई सविता बोऱ्हाडे, दीर अनिकेत बोऱ्हाडे यांनी आपला प्रचंड छळ केल्याचा आरोप रुपाली बोऱ्हाडे यांनी केला आहे. सासरच्यांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच वेळोवेळी रिव्हॉल्वर आणि गुंडांचा धाक दाखवून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. कोणतेही काम न करता शिवऋण संस्थेतून आलेल्या निधीचा वापर स्वत:च्या चैनीसाठी केला. तसेच वेगवेगळ्या मुलींसोबत अनैकतिक संबंध ठेवत फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन कलम 498 (अ) , 420,406,324,323,504,506, 34 शस्त्र आधिनियम 25 (अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. रुपाली यांनी जुन्नरच्या एका स्थानिक पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अक्षयसोबत आपली पहिली भेट कधी झाली तेव्हापासून ते आतापर्यंतच्या सविस्तर घडामोडी सांगितल्या आहेत. रुपाली यांची अक्षयसोबत चर्चा वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती. त्यावेळी रुपाली या कल्याणमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या. अक्षय यानेच आपल्याला लग्नाची मागणी घातलेली, असंही रुपाली यांनी या मुलाखतीत सांगितलं.

अक्षय बोऱ्हाडे रस्त्यावरील किंवा फुटपाथवरील अपंगाची सेवा करतो, असं आपल्याला सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओंमधून समजलं. कल्याण रेल्वे स्थानकावर एक अपंग महिला आपण बघितली. त्याबाबत आपण फेसबुकद्वारे अक्षयसोबत संपर्क करुन माहिती दिली. त्यावेळी अक्षयने कल्याणला जेव्हा येऊ तेव्हा त्यांना घेऊन जाऊ, असं सांगितलं. याच मुद्द्यावरुन एकमेकांचे व्हाट्सअॅप नंबर शेअर करण्यात आले.

त्यातून दोघांमध्ये बातचित सुरु झाली आणि काही दिवसांनी अक्षयने आपल्याला प्रपोज केलं, असं रुपाली यांनी सांगितलं आहे. “काही लोकं जागेवर घाण करतात, ज्यांना गंभीर आजार आहे किंवा ते दुसऱ्यांना मारहाण करतात अशा लोकांना अक्षय हा रात्रीचा घेऊन जायचा. त्यानंतर तो त्यांना कुठेही सोडायचा. तो त्यांना कुठे सोडायचा हे माहिती नाही. माझ्यासोबत अन्याय झालाच.

पण तो छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन लोकांना फसवतोय. तो जे बोलतो त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय ते तपासावं. मी पोलिसात याबाबत तक्रार केलीय. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही”, असं देखील रुपाली म्हणाल्या. यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून, सत्य नेमके काय आहे? हे यथावकाश उघडकीस येईलच!