मित्रांनो!, जसे की आपण सर्वजण हे जाणून आहोतच की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत त्यामागचे कारण म्हणजे अमृता फडणवीस यांचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मंडळी, गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

सगळीकडे कोरोनाच्या नियमांचे पालन करुन जल्लोषात बाप्पाच्या आगमनाची तयारी केली जात आहे. अशामध्ये अमृता फडणवीस यांचे गणेशोत्सव २०२१ निमित्त खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी त्यांनी ‘गणेश वंदना’ हे गाणं गायलं आहे. या गाण्यातून त्यांनी अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

अमृता फडणवीस यांचे हे गाणं सध्या युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. रिलीज झाल्यानंतर या गाण्याला अवघ्या काही मिनिटात दहा हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. गणेश वंदना हे गाणं ४ मिनिटं ४९ सेकंदाचे आहे. अमृता फडणवीस यांनी या गाण्यामध्ये डॉक्टरची भूमिका साकारली आहे. त्यांच्या कुटुंबात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असल्याचे गाण्यात दाखवण्यात आले आहे.

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहात बाप्पाचे स्वागत करत आहेत. मोठ्या उत्साहात घरात बाप्पाची आरती सुरु असते. एककीडे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते तर दुसरीकडे या डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये तातडीने बोलवण्यात येते. ही डॉक्टर आपली जबाबदारी लक्षात घेऊन तात्काळ तयार होऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते. तिच्या कुटुंबातील लोकांचाही तिला पाठिंबा असल्याचे गाण्यात दाखवण्यात आले आहे.

अमृता फडणवीस यांचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सध्या हे गाणं चर्चेचा विषय ठरत आहे. अमृता फडणवीस यांचे हे गाणं कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर आणि आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समर्पित करण्यात आले आहे. त्यांच्या या गाण्याला रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांत १० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. आतापर्यंत त्यांच्या गाण्याचे अनेक व्हिडिओ रिलीज झाले आहेत. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’साठी एक इंग्रजी गाणंही रिलीज केले होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं होतं. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. त्यानंतर अमृता यांची ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, ‘ये नयन डरे डरे’ ही गाणीही चांगलीच गाजली होती.

मागच्या वेळी महिला दिनावर असेच अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले होते. त्यावेळी त्या गाण्यावर प्रतिक्रिया देतांना रोहितदादा पवार म्हणाले होते की, तुम्ही संधीचा योग्य फायदा उठवलात. त्या वेळचे ते गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली होती की, काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.