कोविड-१९च्या संकटाचा सामना करण्यासाठी आपण सगळेच सध्या घरात बसून आहोत. संपूर्ण देश लॉकडाऊन असलेल्या या काळात, मालिकांचे चित्रीकरण सुद्धा बंद आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या जुन्या मालिकांचे फेरप्रक्षेपण करण्याचा निर्णय वाहिन्यांनी घेतला आहे. सर्वांची लाडकी ‘झी युवा’ वाहिनी सुद्धा उत्तमोत्तम आणि दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. ‘लव्ह लग्न लोचा’, ‘फुलपाखरू’ या उत्कृष्ट मालिकांच्या बरोबरीनेच आणखी काही अप्रतिम मालिका, ‘झी युवा’वर पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना हसून लोटपोट व्हायला लावणारा ‘कॉमेडी रस्सा’ दुपारी १२ ते ३ या वेळात अनुभवता येणार आहे. तर, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ ही नृत्यस्पर्धा २७ एप्रिलपासून या वाहिनीवर पुन्हा पाहता येईल.
पंढरीनाथ कांबळी, भरत जाधव, अंकुश चौधरीसारख्या अनेक कलाकारांचा विनोदी अंदाज पुन्हा अनुभवण्याची संधी ‘कॉमेडी रस्सा’ या मालिकेतून मिळणार आहे. कॉमेडीचा हा धमाकेदार सोहळा दुपारच्या जेवणाला अधिक रसभरीत बनवणार आहे. कोरोनाच्या संकटातून मन थोडं हलकं करून घेताना, सगळ्यांची हसून हसून पुरेवाट होणार आहे. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ जाधव याला परीक्षक म्हणून पाहण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. धमाकेदार डान्स परफॉर्मन्स व फुलवा खामकर आणि सिद्धार्थ जाधव यांचे अप्रतिम परीक्षण यांचा मिलाफ ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये आहे. रात्री ८ वाजता ‘डान्स महाराष्ट्र डान्स’चे फेरप्रक्षेपण होणार आहे. सगळ्यांनी घरातच रहा, सुरक्षित रहा आणि लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर संपूर्ण परिवारासोबत ‘कॉमेडी रस्सा’ मेजवानीचा आस्वाद घ्या.