लॉकडाउन च्या काळात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी झी टॉकीज वर सुरु असलेल्या टॉकीज प्रीमियर लीग ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मागील काही रविवारी प्रेक्षकांनी विविध कथानक असलेल्या चित्रपटांची मेजवानी घेतली. या रविवारी म्हणजेच ३ मे रोजी बच्चे कंपनी साठी झी टॉकीज एक खास मेजवानी घेऊन येत आहे “टॉकीज प्रीमियर लीग” मध्ये. भारताने तब्बल २८ वर्षांनंतर जेव्हा मुंबई मध्येच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हाची, “खारी” आणि “बिस्कीट” या भावंडांची हि एक गोष्ट आहे.

अवघ्या सहा वर्षांची खारी म्हणजेच “वेदश्री खाडिलकर” आणि नऊ वर्षांचा बिस्कीट म्हणजेच “आदर्श कदम” यांना घेऊन संजय जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. संजय नार्वेकर,सुशांत शेलार, नंदिता पाटकर, संजीवनी जाधव या अनुभवी कलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. या चित्रपटाला अमितराज आणि सूरज-धीरज या जोडी ने संगीतबद्ध केलं आहे. तर कुणाल गांजावाला यांनी या चित्रपटाचं टायटल साँग गायलं आहे. एकूणच चित्रपटातील सुरेल गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील यात शंकाच नाही.

खारी हे जग आपल्या डोळ्यांनी बघू शकत नसली तरी त्या डोळ्यातली तिची स्वप्नं मात्र खूप मोठी असतात. खारीच्या प्रत्येक स्वप्नाला खरं करून दाखवणं हेच जणू बिस्कीट च्या जगण्याचं ध्येय आहे . हसत खेळत सगळं सुरळीत सुरु असताना खारी बिस्कीटसमोर एक अजब हट्ट करते. भारतात, मुंबई मध्ये सुरु असणाऱ्या वर्ल्डकपचा थरार खारीला अनुभवायचा असतो. त्यामुळे ती वर्ल्डकप मॅच स्टेडिअम मध्ये जाऊन बघण्याचा हट्ट बिस्किट कडे करते. आणि मग सुरु होतो भाबड्या स्वप्नांचा गोड तितकाच हृदयस्पर्शी पाठलाग. आपल्या बहिणीला स्टेडिअम मध्ये जाऊन मॅच दाखवायचीच असा चंग बिस्किट बांधतो.

लाडाची , प्रेमाची बिस्कीट ची क्युट राजकुमारी “खारी” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या खारीला बिस्किट स्टेडिअम मध्ये नेऊन मॅच दाखवतो का ? या छोट्याशा राजकुमारी ची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिस्कीट काय काय करामती करतो.? त्याला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? कोणकोण त्याला या सगळ्यात मदत करतं ? यासाठी नक्की पहा “खारी बिस्कीट” येत्या रविवारी म्हणजेच ३ मे रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.