चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून पडद्यावर दिसणारे व रंगभूमीवर सुद्धा आपल्या अभिनयाची झलक दाखवणारे वैभव मांगले हे आता झी युवा वरील युवा सिंगर एक नंबर या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या नव्या भूमिकेबद्दल साधलेला हा खास संवाद

१. तुमची ओळख एक उत्तम कलाकार म्हणून आहे. पण, आता तुम्ही ‘झी युवा’वरील ‘युवा सिंगर एक नंबर’ या गायन स्पर्धेच्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहात. लोकांसाठी, ही भावना नक्कीच, ‘नया हैं यह’ अशी असेल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

– परीक्षकाची भूमिका मला नक्कीच आवडली आहे. प्रेक्षकांसाठी माझी ही नवी भूमिका वेगळी असू शकेल, पण माझ्या आयुष्यात अभिनयाच्या आधी गाणं आलेलं आहे. आई-वडील, माझे आजोबा या सगळ्यांकडून माझ्याकडे गाण्याचा वारसा चालत आलेला आहे. गाणी ऐकून, त्याचं परीक्षण करणं, ही फारच सुंदर गोष्ट आहे. शिवाय परीक्षण करणं, मला मुळातच आवडतं. त्यामुळे हा माझ्यासाठी एक अभ्यासाचा विषय आहे असं मी म्हणेन.

२. तुम्ही स्पष्टवक्ते आहात, हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. परिक्षण करतांना तुमची भूमिका नक्की कशी असेल?

– मी स्पष्टवक्ता म्हणून प्रसिद्ध आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. कलेच्या बाबतीत कुणीही खोटं बोललेलं मला आवडत नाही. एखाद्या हौशी गायकाला बोलणं, हे मला फारसं गरजेचं वाटत नाही. पण, व्यवसाय म्हणून जर कुणी ही कला स्वीकारत असेल, तर जिथे तो चुकत असेल, तिथे त्याला त्याची चूक दाखवून देणं क्रमप्राप्त असतं. चूक सांगितली गेली नाही, तर त्यांचं नुकसान होतं. तेवढ्यापुरतं दुःख होत असेल, तरीही त्या स्पर्धकाला याचा भविष्यात फायदाच होतो. त्यामुळे एखादा जाणकार जर मार्गदर्शन करत असेल, तर उद्दामपणे, त्याचं म्हणणं डावलून लावणं, अजिबातच योग्य नाही.

३. कुठला स्पर्धक तुमच्यासाठी ‘एक नंबर’चा असेल व का?

– जो स्पर्धक सुरांची उपासना करतो. तो निश्चितपणे महत्त्वाचा ठरतो. संगीतकाराने सांगितलेली चाल लगेचंच जाणून घेता येणं गरजेचं आहे. रागातील आरोह-अवरोह, वादी-संवादी सूर योग्यप्रकारे जाणता येणं, ही कला जमायला हवी. असा गायक पार्श्वगायनासाठी तयार असतो. असाच स्पर्धक माझ्यासाठी ‘एक नंबर’ असेल.

४. हे व्यासपीठ नवीन लोकांसाठी किती महत्त्वाचे आहे?

– कुठलीही स्पर्धा ही गायकासाठी महत्त्वाचीच असते. अर्थात, ‘झी युवा’सारख्या मंचावरील स्पर्धेत सहभागी होणे, ही मोठी गोष्ट आहे. इथून बाहेर पडणारा प्रत्येकच स्पर्धक, खूप काही शिकून व यशस्वी होऊन बाहेर पडेल. अर्थात, ही यशाची पहिली पायरी असेल आणि पुढील यशाच्या वाटचालीसाठी ‘युवा सिंगर, एक नंबर’मधून खूप काही शिकायला मिळेल.

५. तुम्हाला कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला आवडते? तुमचे आवडते गायक कोण आहेत?

– पूर्वीपासूनच मी सुगम संगीत ऐकत आलो आहे. लता मंगेशकर माझ्या सर्वांत आवडत्या गायिका आहेत. शिवाय शास्त्रीय संगीत, ही माझी आवडीची गोष्ट आहे. अभिजात शास्त्रीय संगीत हे एक भावसंगीत आहे असं मला वाटतं. किशोरी ताईंनी स्वतःचं असं एक घराणं यात निर्माण केलं आहे. त्यांचं शास्त्रीय संगीत ऐकणं, हीदेखील एक पर्वणी असते. शास्त्रीय संगीताच्या सुरांमध्ये रमायला सुद्धा मला फार आवडतं.

६. सावनी आणि मृण्मयी या तुमच्या सहकाऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगाल?

– मृण्मयी देशपांडे ही उत्तम अभिनेत्री व नर्तिका असलेली गुणी कलाकार सूत्रसंचालन करणार आहे. कलेची उत्तम जाण असल्याने ती उत्कृष्ट सूत्रधार आहे. सावनी शेंडे अभिजात शास्त्रीय संगीतातील एक उत्तम गायिका आहे. किशोरी ताई आमोणकर, लता मंगेशकर हे आमचं दोघांचंही भक्तीचं स्थान आहे. शिवाय, कुठल्याही स्पर्धकाविषयी टिप्पणी करत असतांना, आमची मतं बहुतांशी सारखी असतात. इतकं साम्य आमच्यात असल्याने आमची छान गट्टी जमली आहे.