सगळ्यांच्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर एक खास ‘मैफिल’ रंगणार आहे. संगीत क्षेत्रातील वेगवेगळ्या नामांकित व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. क्रांती रेडकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. ‘मैफिल’च्या प्रत्येक भागात एक विशेष पाहुणा मंचावर उपस्थित असेल. त्याच्या साथीने गप्पा आणि संगीताची एक अनोखी मैफिल रंगेल. प्रेक्षकांची फर्माईश लक्षात घेऊन विविध गाणी सादर केली जाणार आहेत. अशा या निराळ्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका असलेल्या क्रांतीशी जेव्हा खास गप्पा मारल्या तेव्हा;
१. पहिल्यांदाच तू संगीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेस. तुझ्या भावना काय आहेत?
एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. विनोदी कार्यक्रम किंवा अवॉर्ड शोजचं सूत्रसंचालन करण्यापेक्षा, हे आव्हान नक्कीच वेगळं असणार आहे. संगीत क्षेत्रातील अनेक अनुभवी व्यक्तींसोबत काम करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. संगीत ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. मंचावर काय घडतंय, एवढंच सांगण्यापलीकडे, मला आणखी समृद्ध करणारे उत्तमोत्तम अनुभव या कार्यक्रमातून मिळतील, हे निश्चित!!
२. अभिनय, नृत्य आणि निवेदन या तीनपैकी तुझ्यासाठी सर्वात आवडतं काय आहे?
अभिनय आणि नृत्य या दोन कलांविषयी मला अधिक आपुलकी आहे. यापैकी नृत्यकलेविषयी म्हणाल, तर ही कला नैसर्गिकपणे माझ्या आलेली आहे. मी एकटी असतानाही, मनमुरादपणे नाचू शकते. अभिनायाची सुद्धा मला खूप आवड आहे. अभिनय करणं, ही गोष्ट या तिन्हीमध्ये माझ्यासाठी सर्वात जास्त जवळची आहे असं म्हणता येईल. निवेदन हा माझा छंद आहे, आणि तो जोपासायला सुद्धा मला आवडतं. निवेदक हा कार्यक्रमाला धरून ठेवणारा एक महत्त्वाचा धागा असतो. त्यामुळे निवेदन करण्याची एक वेगळी मजा आहे. अभिनय आणि नृत्याशी त्याची तुलना करणं मला शक्य होणार नाही.
३. तुला गायला आवडतं का? कुठल्या प्रकारची गायन ही तुझी आवड आहे?
गाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मला हेवा वाटतो असं म्हणायला हरकत नाही. देवाने इतका सुंदर गळा त्यांना दिला याचा हेवा नक्कीच वाटतो. मला गायला आवडतं; म्हणूनच मला असं वाटतं, की मी गाणं शिकायला हवं होतं. व्यावसायिक गायक होता आलं नसतं, तरीही स्वतःपुरतं गाण्याचा आनंद मला नक्कीच लुटता आला असता.
४. यानिमित्ताने ‘झी युवा’सोबत पुन्हा एकदा काम करणार आहेस. त्याविषयी तुझ्या भावना काय आहेत?
‘झी युवा’ हे माझ्यासाठी एक महत्त्वाचं कुटुंब आहे. मी या वाहिनीसोबत खूप काम केलेलं आहे. मी एका कार्यक्रमाचं निवेदन करते आहे; एवढाच विचार यावेळी नसतो. हा आपला कार्यक्रम आहे, आपल्याला यात आणखी चांगलं काय करता येईल, ही भावना ‘झी युवा’च्या टीमसोबत काम करताना मनात असते.
५. या नव्या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांना काय सांगशील?
संगीतकारांना जेवढा आदर आणि सन्मान मिळायला हवा, तो आपण द्यायला विसरतो, असा सल मनात कुठेतरी आहे. त्यांना जगासमोर आणणारा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे त्याचं महत्त्व अधिक आहे. प्रत्येक गाण्याची एक पार्श्वभूमी असते, एक छोटीशी गोष्ट असते. ती सगळ्यांना माहिती नसते. या गमतीजमती, हे किस्से लोकांपर्यंत पोचवता यावेत, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. खरंतर, या कार्यक्रमाविषयी जेवढं बोलावं, सांगावं तेवढं कमीच आहे. हा अप्रतिम कार्यक्रम सगळ्यांनी नक्की पाहायला हवा. सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० या वेळात ही मैफिल झी युवा वाहिनीवर अनुभवता येईल.