चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार रजनीकांत एकदा मुख्यमंत्री जयललिता येत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये अडकले. वारंवार होत असलेल्या ह्या प्रकाराला कंटाळून त्यांनी असे काही तरी केले जे फक्त रजनीकांतच करू शकतात.

१९९२ चा काळ होता. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता घरातून निघण्याआधी अर्धा तास त्यांच्या निवासस्थानाच्या आजूबाजूचे सगळे रस्ते बंद केले जायचे जेणेकरून त्यांच्या गाड्यांचा ताफा विनाअडथळा रस्त्यावरून जाऊ शकेल. पण ह्यामुळे सामान्य जनतेला खूप त्रास होत असे आणि वरचेवर होणाऱ्या ह्या प्रकारामुळे जनता त्रस्त झाली होती.

दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत असेच एकदा चेन्नईतील डॉ. राधाकृष्ण मार्गावरून जात असताना त्यांची कार थांबविण्यात आली. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी गाडीच्या खिडकीजवळ येऊन बोलला,

पोलीस: माफ करा सर, पण जो पर्यंत मुख्यमंत्री जयललिता ह्यांची गाडी ह्या रस्त्यावरून जात नाही तो पर्यंत अन्य कोणत्याही वाहनाला जाता येणार नाही.

रजनीकांत: मग त्या कधी जाणार आहेत इथून?

पोलीस: अंदाजे अर्धा तास तरी लागेल.

रजनीकांत: कोणतीही कार किंवा गाडी नक्कीच एवढी मोठी नाही आहे की त्याला रस्ता क्रॉस करायला अर्धा तास लागेल. तुम्ही एक काम का करत नाही की जो पर्यंत मुख्यमंत्र्यांची गाडी दिसत नाही तो पर्यंत इतर गाड्यांना आणि माणसांना जाऊ का देत नाहीत?

पोलीस: वरिष्ठांची आज्ञा सर!

रजनीकांत: तुम्ही हे मुद्दामहून तर करत नाही आहात ना?

पोलीस अधिकाऱ्याने उत्तर दिले नाही. रजनीकांत ह्यांना खूप राग आला. रागाच्या भरात त्यांनी मनात काही तरी ठरविले आणि गाडीच्या खाली उतरले. रस्त्याच्या कडेच्या एका टपरीवरून त्यांनी सिगारेटचे पॅकेट विकत घेतले आणि तिथेच एका लाईटच्या खांबाला टेकून उभे राहून सिगारेट पेटवली.

चित्रपट सृष्टीतील देव असा अचानक रस्त्यावर उतरलेला बघून चाहत्यांची झुंबड उडाली. ट्रॅफिकमध्ये अडकलेले लोक रजनीकांत ह्यांच्या अवतीभवती गर्दी करू लागले. क्षणार्धात झालेल्या ह्या गर्दीमुळे डॉ. राधाकृष्ण मार्गाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

काही क्षणातच जयललिता ह्यांच्या गाड्या येणार असल्याने पोलीस चिंतेमध्ये पडले. पुन्हा तो मघासचा पोलीस अधिकारी रजनीकांत ह्यांच्या जवळ गेला आणि बोलला.

पोलीस: सर आता काही क्षणातच मुख्यमंत्री येतील तेव्हा तुम्हाला विनंती करतो की जरा बाजूला व्हावे आणि त्यांच्या ताफ्याला वाट करून द्यावी.

रजनीकांत: सर, मी पण त्यांच्या जाण्याची वाट बघतो आहे आणि आता कितीही वेळ वाट बघायला मी तयार आहे.

ह्याच्या काही वर्षांनंतर समाजमनावर पगडा असणाऱ्या रजनीकांत ह्यांनी एक राजनैतिक विधान केले ज्याचा परिणाम पण पुढील निवडणूकीच्या परिणामांवर जाणवला. जयललिता जर पुन्हा निवडून आल्या तर साक्षात देव पण तामिळनाडू राज्याला अधोगतीपासून रोखू शकत नाही.

त्या निवडणूकीमध्ये जयललिता ह्यांचा पराभव झाला!

Copyright: महेंद्र राऊत