आपल्या दिलखेचक अदांनी सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री श्वेता शिंदे, आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ‘डॉक्टर डॉन’ची डार्लिंग डीन म्हणून, ‘झी युवा’ वाहिनीवर श्वेता तिच्या अभिनयाची झलक दाखवत आहे. डॉनला वश करणाऱ्या या डार्लिंगशी मनमोकळ्या गप्पा मारल्या असता, तिने अनेक गोष्टी शेअर केल्या.

१. प्रेक्षक श्वेताच्या प्रेमात आहेत, हे सगळ्यांना माहीत आहेच. पण, एक इंटरनॅशनल डॉन, या डीनच्या प्रेमात पडलेला आहे. हा मामला नक्की काय आहे?मी साकारत असलेली, मेडिकल कॉलेजची डीन अतिशय शिस्तप्रिय आहे. नियमबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या कॉलेजमध्ये इंटरनॅशनल डॉन, देवा ऍडमिशन घेतो आणि खरी धमाल सुरू होते. हे सगळे सीन्स शूट करत असताना आम्ही खूप मजा करतोय. प्रेक्षकांना सुद्धा, या कॉलेजचा बदललेला माहोल पाहताना खूपच मजा येईल, याची खात्री आहे.

२. देवदत्त नागेच्या फिटनेसबद्दल सगळ्यांनाच अनेक गोष्टी माहीत आहेत. मात्र श्वेताच्या फिटनेसबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. त्याविषयी काय सांगशील?माझ्या फिटनेसविषयी बोलण्यापेक्षा, मी देवदत्तच्या वर्कआऊटबद्दल बोलणं पसंत करेन. तो एवढा फिट आहे, याबद्दल सगळ्यांना ठाऊक नसलेली एक गोष्ट मी आज तुम्हाला सांगते. वर्कआऊट करण्याची त्याची विशिष्ट वेळ नाही. दुपारी दोन वाजता, संध्याकाळी सहा वाजता, मध्यरात्री बारा वाजता किंवा अगदी पहाटे दोन वाजता सुद्धा देवदत्त व्यायाम करत असलेला दिसू शकतो. इतकी मेहनत घेतल्यावर तो फिट असणार यात शंकाच नाही. माझ्या फिटनेसविषयी विचाराल, तर मी त्याच्याकडून शिकते आहे, असं मी म्हणेन.

३. शूटच्या निमित्ताने तुम्ही सेटवर खूप धमाल करत असाल. त्याबद्दल आम्हाला काय सांगशील?
मी पहिल्यांदाच झी युवा या वाहिनीसोबत काम करतेय आणि डॉक्टर डॉनची संपूर्ण टीम खूप यंग आणि एनर्जेटिक असल्यामुळे सेटवर नेहमी खेळीमेळीचं वातावरण असतं. या मालिकेचं शूटिंग एका कॉलेजमध्ये होत असल्यामुळे आम्हाला देखील आमच्या कॉलेजचे दिवस पुन्हा अनुभवायला मिळतायत. रोहिणी ताई, देवदत्त, डॉ. डॉनची संपूर्ण गॅंग – आम्ही सगळे मिळून सेटवर ऑन-स्क्रिन आणि ऑफस्क्रीन धमाल करत असतो. मालिकेत देवा हा डीनच्या प्रेमात असल्यामुळे तिच्यावर छाप पाडण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत असतो. देवा वेगवेगळ्या पद्धतीने डीनला प्रपोज करताना मालिकेत पाहायला मिळणार आहे. सेटवर आम्ही अनेकवेळा याची रिहर्सल करतो. देवदत्त वेगवेगळ्या प्रकारे मला सेटवर प्रपोज करत असतो.

४. ही भूमिका इतर भूमिकांपेक्षा वेगळी आहे. या भूमिकेच्या वेगळेपणाबद्दल आम्हाला काय सांगशील?एका मेडिकल कॉलेजच्या डीनची भूमिका मी साकारते आहे. ती अत्यंत शिस्तप्रिय आहे. मी याआधी साकारलेल्या अनेक भूमिकांमध्ये मी एकतर्फी प्रेम केलेलं आहे. या भूमिकेत मात्र हिरो माझ्या प्रेमात पडलाय. खलनायिकेच्या भूमिकेत, एकतर्फी प्रेम करून करून, मी खूप कंटाळले होते; ‘झी युवा’ने ही उत्तम संधी मला दिलेली आहे.

५. ही भूमिका तू उत्तमप्रकारे साकारत आहेस, यासाठी तुला कुणाकडून प्रेरणा मिळाली?मला या भूमिकेबद्दल विचारणा केली, त्यावेळी सुश्मिता सेन हिचा फोटो दाखवण्यात आला होता. मी मालिकेसाठी अशीच दिसणं अपेक्षित आहे, असं मला सांगण्यात आलं होतं. असा आदर्श डोळ्यासमोर असेल, आणि भूमिका साकारायची असेल, तर निश्चितच खूप प्रेरणा मिळते. काम सुरू केल्यापासून, आजपर्यंतचा प्रवास पाहिला, तर मी योग्यप्रकारे भूमिका साकारत आहे, याची खात्री वाटते आहे.