रोमियो-ज्युलिएट, हिर-रांझा, लैला-मजनूच्या प्रेमकहाणी बरोबरच आपल्या मराठी मातीतील मल्हार-मायडी ची प्रेमकथा लवकरच ‘इभ्रत’ या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या मराठमोळ्या प्रेमकथेवर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख कथानकाच्या कॉपीराईट वादामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या लांबणीमुळे प्रेक्षकांमध्ये रंगलेली चित्रपटाची चर्चा आणि चित्रपटाबाबतचची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली. असे असताना लवकरच नव्या जोमाने हा चित्रपट सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे. ‘डॉल्फिन सिनेक्राफ्ट’ प्रस्तुत श्रुती वसंत दांडेकर निर्मित आणि प्रवीण रमेश क्षीरसागर दिग्दर्शित प्रेमकथेवर सूचक भाष्य करणारा ‘इभ्रत’ हा चित्रपट मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे.

‘आवडी‘ या अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारलेली सत्य घटनेवर आधारित इभ्रत चित्रपटाची कथा-पटकथा आहे. शिवाय ‘इभ्रत’ या म्युझिकल प्रेमकहाणीला हिंदी मराठी सृष्टीतील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायकांनी म्हणजेच साधना सरगम, बेला शेंडे,रुपकुमार राठोड, आनंद शिंदे, नंदेश उमप, जसराज जोशी आणि आकांक्षा भोईर यांनी आपल्या सुमधुर आणि दमदार आवाजात शब्दबद्ध केले आहे. तर संगीत दिग्दर्शक अशोक कांबळे आणि बबन अडागळे यांनी चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे. या चित्रपटातील प्रेमकथेची पटकथा, संवाद आणि गाण्याचे बोल संजय नवगिरे लिखित आहेत. चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा, डॉ. सुधीर निकम, अनिकेत केळकर, वृषाली हटळकर, राहुल बेलापूरकर, सोमनाथ तडवलकर आदी कलाकारांनी महत्वपूर्ण भूमिका वठवल्या आहेत. चित्रपटाच्या वितरणात पिकल एंटरटेनमेंटचा खारीचा वाटा आहे.

 

मल्हार-मायडीच्या या रांगड्या प्रेमकथेचा प्रवास मोठ्या पडद्यावर येण्यास कथानकाच्या वादावरून उद्भवलेल्या अडचणीमुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. मात्र संबंधित प्रकाराचा उलगडा होताच ‘इभ्रत’ हा चित्रपट येत्या 13 मार्च 2020 रोजी सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होईल याची हमी देण्यात आली आहे.