मधूमेह, रक्तदाब ह्यासोबतच मूळव्याधीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मूळव्याध अर्थात पाईल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या रोगाला आयुर्वेदात ‘अर्श’ असे म्हटले जाते. ‘अर्श’ म्हणजे असा रोग जो सतत जीवाला एखाद्या शत्रुसारख्या मरणयातना देतो. ह्यावरूनच कळेल की हा किती त्रासदायक आहे.

गुदभागाच्या रक्तवाहिन्यांवर ताण आल्यामुळे त्या सुजतात व तिथे मोड येतो ह्याला मूळव्याध म्हणतात. गुदभागी आग होणे, दुखणे, शौचावाटे रक्त पडणे, मोड जाणवणे ह्यावरून मूळव्याध आहे असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांकडून लक्षणांची प्रत्यक्ष व योग्य तपासणी करून मूळव्याध, भगंदर, फिशर ह्यांपैकी नक्की कोणता रोग आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

कफ,वात, पित्त ह्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ह्यावरून मूळव्याधीचे विविध प्रकार पडतात. कफामुळे जो मूळव्याध होतो त्यात कंड अधिक असते. वाताचा सहभाग असणाऱ्या मुळव्याधीमध्ये प्रचंड वेदना असतात, तर पित्त व रक्तदोषामुळे  होणाऱ्या मुळव्याधीमुळे आग होते, शौचात रक्त पडते. प्रत्येक मुळव्याधीमध्ये रक्त पडेलच असे नाही.

हा रोग गुदभागात होत असला तरी ह्याचे मूळ आहारात आहे. विरुद्ध आहार, अपचन, पचण्यास जड, तिखट पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न, मांसाहाराचे सेवन, मैथुनकर्म, मल-मूत्र-वायू (पाद) अशा नैसर्गिक गोष्टींना रोखून ठेवणे ह्या कारणामुळे मूळव्याध होऊ शकतो.

ह्या गोष्टी नक्की करा

  • डॉक्टरांचा सल्ला

लक्षणांची योग्य तपासणी करून रोगाबद्दल जाणून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती औषधी घ्या.

  • नारळाचे तेल

नारळाचे तेल हे उत्तम मॉइश्चरायझर असते. रोगाच्या ठिकाणी लावल्याने जळजळ, सूज, खाज कमी होण्यास मदत होते.

  • कोरफड

कोरफड ही अँटी-इन्फ्लामेट्री  आहे. कोरफडीचा गर आग व सूज कमी करण्यास मदत करते. लक्षात ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरफडीचे सेवन अजिबात करू नका.

  • भरपूर पाणी प्या

भरपूर पाणी पिल्याने शौच साफ होण्यास मदत होते.

  • फायबरयुक्त आहार

फायबरने परिपूर्ण असलेल्या फळं व भाज्यांचा आहारात समावेश करा. फायबर पाणी शोषून घेतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पाणी तर मिळतेच शिवाय शौच साफ होण्यास मदत होते.

  • तूप

रात्री झोपण्याआधी 2-3 चमचे तूप गरम पाण्यात घेतल्याने आराम मिळतो.

  • बेलफळ

बेलफळाचा गर व पाठचूर्णाचे मिश्रण वेदना कमी करण्यास मदत करते.

  • सुरण

वाफवलेल्या सुरणाची भाजी, तूप व ताकाचे सेवन फायदेशीर आहे.

  • ह्या गोष्टींचे सेवन करा

तांदूळ, गहू, ज्वारी, सुरण, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, आवळा, दुधीभोपळा, मनुका

  • ह्या गोष्टी टाळा

मका, उडीद, वाल, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, लोणची, पापड

भक्ती संदिप

(Nutritionist in Foodvibes Grocers)