मित्रांनो!, मनुष्य हा नात्यांच्या धाग्यांनी परस्परांशी बांधला गेलेला आहे. प्रत्येक नातं, जुळावे, फुलावे, बहरावे असेच आपल्या सर्वांना वाटत असते. परंतु कधीकधी या नात्याचा शेवट अकल्पित असतो. कधी कधी या प्रेमळ जोडप्यांची नाती तुटतात, तर कधी विवाहित जोडप्यांचे घटस्फोट होतात. परंतु, त्याहूनही अधिक वाईट घटना काही जोडप्यांच्या विवाहित जीवनात घडतात.

अलीकडेच अभिनेत्री मंदिरा बेदी हिचा पती राज कौशल यांचे निधन झाले. राज अवघ्या 49 वर्षांचे होते आणि मंदिराने देखील एप्रिलमध्ये तिचा 49वा वाढदिवस साजरा केला होता. दोघांच्या सुंदर आयुष्याला नजर लागली, हृदय विकाराच्या झटक्यामुळे राज यांचा मृत्यू झाला. मंदिराशिवाय बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटीज आहेत ज्यांनी तरुण वयातच आपले जीवनसाथी गमावले. त्यांच्यावर एक नजर टाकूया…

गुरु दत्त-गीता दत्त – दिग्गज अभिनेता-दिग्दर्शक आणि निर्माता गुरु दत्त यांनी 1953 मध्ये आपल्या काळातील प्रसिद्ध पार्श्वगायक गीता दत्तशी लग्न केले. त्यांना तरुण, अरुण आणि नीना ही तीन मुलं होती. लग्नानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर, गुरु दत्तचे नाव वहीदा रहमानशी जोडले गेले. 1964 मध्ये गुरु दत्त यांनी जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनानंतर गीता शॉकमध्ये गेल्या. 1972 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षानंतर गीता दत्त यांचेही वयाच्या 41व्या वर्षी निधन झाले.

मीना कुमारी-कमाल अमरोही – ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री मीना कुमारीने वयाच्या 18 व्या वर्षी 14 फेब्रुवारी 1952 रोजी 34 वर्षीय कमल अमरोहीशी लग्न केले. मीना आणि कमलच्या विवाहित जीवनातील बर्‍याच कथा प्रसिद्ध आहेत. 31 मार्च 1972 रोजी मीना यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीना यांच्या निधनानंतर कमल अमरोहीने दुसरे लग्न केले.

लीना चंदावरकर-किशोर कुमार – सुनील दत्तच्या ‘मन का मीत’ या चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री लीना चंदावरकर यांनी 1975मध्ये सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केले. सिद्धार्थला लग्नानंतर काही दिवसांनी गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 1980 मध्ये लीनाने ज्येष्ठ अभिनेते आणि गायक किशोर कुमारशी लग्न केले. त्यांचे लग्न 7 वर्षे चालले आणि नंतर हृदयविकाराच्या झटक्याने किशोर यांनीही जगाचा निरोप घेतला. किशोरच्या मृत्यूच्या वेळी लीना अवघ्या 37 वर्षांची होती.

विजयेता पंडित-आदेश श्रीवास्तव – 1990मध्ये विजयेता पंडित यांनी पार्श्वगायक-संगीतकार आदर्श श्रीवास्तव यांच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला अनिवेश आणि अवितेश अशी दोन मुले झाली. त्याच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चालू होते की, 2015मध्ये कर्करोगामुळे आदेश श्रीवास्तव यांचे निधन झाले.

रेखा-मुकेश अग्रवाल – 1990 मध्ये रेखाने दिल्लीस्थित उद्योगपती मुकेश अग्रवालशी लग्न केले. पण, लग्नाच्या वर्षभरानंतर मुकेशने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केली. वृत्तानुसार, त्यावेळी रेखा फक्त 35 वर्षांची होती. इतक्या लहान वयातच रेखाला आयुष्यात मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला.

शांतीप्रिया-सिद्धार्थ रे – शांतीप्रिया अक्षय कुमारच्या ‘सौगंध’ या चित्रपटात दिसली होती. 1999मध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ रेशी लग्न केले. ‘बाजीगर’ या चित्रपटात सिद्धार्थ काजोलबरोबर ‘छुपाना भी नहीं आता’ या गाण्यात दिसला होता. त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. 2004 साली लग्नाच्या पाच वर्षानंतर सिद्धार्थ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी अभिनेत्री केवळ 35 वर्षांची होती.

प्रिया अरुण-लक्ष्मीकांत बेर्डे – मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मराठी अभिनेत्री प्रिया अरुणशी लग्न झाले होते. या जोडीला दोन मुलेही आहेत. लक्ष्मीकांत यांचे 16 डिसेंबर 2004 रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर प्रिया अरुण यांनी स्वत:ची काळजी घेतली आणि आजही त्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.

 

कहकशां पटेल-आरिफ पटेल – कहकशां पटेल हे पंजाबी संगीत विश्वातील एक मोठे नाव आहे. ती तिच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती. कहकशांने व्यापारी असणाऱ्या अरिफ पटेलशी लग्न केले होते. लग्नानंतर हे जोडपे अरहान आणि नुमैर या दोन मुलांचे पालक झाले. पण त्याचे सुखी आयुष्य 2018मध्ये बदलले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे आरिफचा मृत्यू झाला.

इरफान खान-सुतपा सिकदर – अभिनेता इरफान खानने 23 फेब्रुवारी 1995 रोजी लेखक सुतपा सिकदरशी लग्न केले. इरफानला त्याच्या न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचे निदान 2018 मध्ये झाले होते. उपचार चालू होते आणि त्यानंतर त्याने पुन्हा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. परंतु, 29 एप्रिल 2020 रोजी कोलनच्या संसर्गामुळे त्यांचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले. इरफानच्या जाण्याने सुतापाला जबरदस्त धक्का बसला, परंतु त्यांची दोन मुले बाबील आणि अयान यांनी तिला आधार दिला.