मित्रांनो! आज ८ सप्टेंबर … महाराष्ट्राच्या महागायिका आशाताई भोसले यांचा वाढदिवस. (८/९/१९३३) मास्टर दीनानाथ यांच्या घरी जन्मलेल्या ५ अद्भुत संगीतरत्नांपैकी एक. आशा भोसलेंनी वयाच्या १० व्या वर्षांपासून आपल्या गायला सुरूवात केली आणि तेव्हापासून आजतागायत त्या सतत गात आहेत. १९४८ च्या चुनारिया या चित्रपटातुन “हिंदी” चित्रपटात गाणे सुरू केले. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘सावन आया’ हे गाणे गायले.

आशाजींनी एक हजाराहून अधिक चित्रपटांत गाणी गायली आहेत असे म्हणतात. सन २००६ मध्ये आशजींनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी १२ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. गिनीज बुकानुसार त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके आणि पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. आशा भोसले यांनी ‘माई’ चित्रपटात काम देखील केले आहे. त्यांच्या या अभिनयाबद्दल त्यांचे कौतुकही झाले.

वयाच्या १६ व्या वर्षी आशा ताईचे ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी लग्न झाले. गणपतराव भोसले हे लता मंगेशकरांचे वैयक्तिक सचिव होते. लतासह संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांच्या विरोधात आशाने पळून जाऊन लग्न केले. आशा ताईंना गणपतराव यांच्यापासून तीन मुले झाली. तिसऱ्या मुलाच्या वेळी प्रेग्नन्ट असतांना गणपतरावांनी आणि त्यांच्या घरच्यांनी मारहाण करुन आशाजींना घराबाहेर हाकलून दिले. त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव हेमंत असून तो पायलट होता.

नंतर संगीत दिग्दर्शक म्हणून हेमंत यांनी काही चित्रपट केले. मुलगी वर्षा वर्तमानपत्रांसाठी लिहायची. तरुण मुलगा आनंदने व्यवसाय आणि चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास केला असून तो आशाजींच्या गायन कार्यक्रमांचे संयोजनही सांभाळतो आहे. आशा ताईची मुलगी वर्षा हिने २०१२ मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी आत्महत्या केली. आशाजींनी ६ वर्षांनी लहान असलेल्या दिग्गज संगीतकार राहुल देव बर्मनबरोबर दुसरे लग्न केले. आरडीचेही हे दुसरे लग्न होते.

आशा भोसले या गाण्याव्यतिरिक्त स्वयंपाक करण्यातही पारंगत आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे बऱ्याचदा आशा ताईंकडून कढई गोस्त आणि मटण बिर्याणीची फर्माईश करतात. आशाताईंनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, गायनातील त्यांची कारकीर्द बहरली नसती तर त्या शेफ झाल्या असत्या. आशा भोसले यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय प्रचंड विस्तारलेला आहे. दुबई आणि कुवेत मधील “आशा’ज” नावाची सुप्रसिद्ध रेस्टॉरंट्स आहेत. पारंपारिक उत्तर-पश्चिम भारतीय खाद्य तेथे खवैय्यांच्या चवीसाठी उपलब्ध आहेत.

या शिवाय अबू धाबी, दोहा, बहरेन येथेही त्यांचे रेस्टॉरंट्स आहेत. या रेस्टॉरंटच्या मेन्यू, टेस्ट, आणि अंतर्गत सजावटीमध्ये आशा ताईंचा खूप मोठा सहभाग आहे. त्यांनी स्वतः जवळजवळ ६ महिने त्यांचा हॉटेल मधील शेफला प्रशिक्षण दिलेय. ‘रसेल स्कॉट’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुकने ब्रिटनसाठी आशा’ज या हॉटेल ब्रँडचे हक्क विकत घेतले आहेत. त्यांच्या योजनेनुसार आशा’ज नावाची रेस्टॉरंट्स ची चेन येत्या काही वर्षात तिकडे सुरू होईल.

‘ब्रिमफुल ऑफ आशा’ हे गाणे ब्रिटनच्या अल्टरनेटिव्ह रॉक बँड ने १९९७ मध्ये प्रसिद्ध केले होते. आशा भोसले यांना समर्पित हे गाणे प्रचंड आंतरराष्ट्रीय हिट ठरले होते. आशाजी १८ वेळा फिल्मफेअरसाठी नामांकित झाल्या आहेत. त्यांनी तो ७ वेळा जिंकलाही आहे.

सन १९७९ मध्ये फिल्मफेअर जिंकल्यानंतर आशाजींनी नवीन प्रतिभेला संधी मिळायला हवी, असे सांगून या पुरस्कारासाठी नामांकन करण्यास नकार दिला. २००१ मध्ये आशाजींना फिल्मफेअरचा लाइफटाइम पुरस्कार देण्यात आला. आशा भोसले या उस्ताद अली अकबर खान यांच्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित होणाऱ्या पहिल्या गायिका ठरल्या होत्या.

आमच्या संपूर्ण स्टार मराठीच्या टीमतर्फे आशाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!