आजकाल तापसी पन्नू तिच्या आगामी ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाबद्दल चांगलीच चर्चेत आहे. तिच्यासोबत विक्रांत मैस्सी आणि हर्षवर्धन राणे देखील या चित्रपटात आहेत. ‘हसीन दिलरुबा’ २ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. त्याचे प्रमोशन जोरात सुरू आहे. अशाच एका मुलाखतीत, तापसीने स्वतःबद्दल सध्या मीडियात पसरलेल्या एका अफवेचे फॅक्ट चेक केले. ती म्हणजे शाहरुख खानच्या समोर तापसी खरोखरच राजकुमार हिराणीच्या आगामी फिल्ममध्ये लीड हिरोईनचा रोल करणार ?

सध्या शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ या कमबॅक सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. रिपोर्ट्सनुसार शाहरुख राजकुमार हिरानी आणि एटली कुमार यांच्या आगामी चित्रपटातही तो काम करणार आहे. ‘पठाण’ चे संपूर्ण काम केल्यावर सप्टेंबरपासून हिरानीच्या नव्या चित्रपटाची सुरूवात होईल. जी एक सोशल कॉमेडी आहे, त्यामध्ये इमिग्रेशनच्या मुद्दय़ावर तिरकस विनोदी शैलीने भाष्य केले जाईल. याच चित्रपटात शाहरुखच्या समोर तापसी पन्नू कास्ट केल्याची चर्चा आणि बातम्या मीडियात जोर धरत आहेत. “कोइमोई” ला दिलेल्या मुलाखतीत तापसीला याबाबत सरळ स्पष्टीकरण मागितले गेले होते. या अनुमानांना उत्तर देताना तापसी म्हणाली की…

“असे काहीतरी घडत असेल तर मी स्वतःच माझ्या छतावर चढून ओरडून सांगेन. ‘अरे देवा!, हे जर लोकांना कळले तर काय होईल.’ या प्रकारातली ही काही लज्जास्पद बातमी नाहीय. म्हणून जेव्हा या बाबत करार-मदार, स्वाक्षरी होऊन त्यावर पक्के शिक्कामोर्तब होईल, तेव्हा मी स्वत:च मुंबईला ओरडून सांगेन. इतके की, तुम्ही मुंबईत कुठेही असाल तर माझा आवाज ऐकू येईल. ”

थोडक्यात, शाहरुखबरोबर एखादा चित्रपट करण्यास स्वतः तापसी सुद्धा खूप उत्साही आहे. परंतु अद्याप तिने हा चित्रपट साइन केलेला नाही. शाहरुखच्या एका सिनेमात तापसीने काम केले असले तरी त्यात स्वतः शाहरुख नव्हताच. त्याची कंपनी रेड चिलीजने अमिताभ बच्चन अभिनीत ‘बदला’ ची निर्मिती केली होती. पण तापसी आणि शाहरुख या दोघांनी एकत्र कोणत्याही चित्रपटात भूमिका केलेली नाही.

आत्ता तापसीचे शेड्यूल चित्रपटांनी भरलेले आहे. तीचा ‘हसीन दिलरुबा’ रिलीजच्या वाटेवर आहे. याशिवाय ती ‘लूप लपेटा’, ‘रश्मी रॉकेट’, ‘दोबारा’ आणि ‘शाबाश मिठू’ सारख्या चित्रपटांमध्येही काम करत आहे.’हसीन दिलरुबा’ च्या प्रमोशन दरम्यान, तापसीला कंगनाच्या ट्विटर बंदीबद्दल विचारले गेले होते. तापसी म्हणाली की, ती कंगनाला काही मिस वैगेरे करत नाही. त्याचबरोबर ती म्हणाले की कंगना तिच्यासाठी पूर्णपणे दुर्लक्षित आहे. कंगनाबद्दल कोणत्याही प्रकारची भावना, चांगले किंवा वाईट तिच्या मनीध्यानीही नाही.

याच्या प्रत्युत्तरात कंगना म्हणतेय की, “कंगनाजी ज्या काही भूमिका सोडल्या आहेत, त्या मला द्या! असे सांगून तापसी निर्मात्यांना भीक मागायची.” आणि आता तिची हिंमत पहा! जिला एकेकाळी ‘गरीब प्रोड्युसरची कंगना’ म्हटल्याचा अभिमान होता, आज ती मला दुर्लक्षित म्हणत आहे. मनुष्यस्वभाव विचित्र आहे. ठीक आहे, आपल्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा मुली. जरा माझे नाव न घेता स्वतःचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न कर. ” आगामी काळात कंगनाचा ‘थलैवी’ रिलीज होणार आहे. या व्यतिरिक्त कंगना इंदिरा गांधींची बायोपिक ‘इमरजेंसी’, ‘धाकड’ आणि ‘तेजस’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करत आहे.