वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी सिनेमाची सुमधुर गाणी सिनेमाला आजीवन संजीवनी देत असतात. संगीत रसिकांच्या तोंडी गुणगुणली जाणारी श्रवणीय गाणी वेगळ्याच विश्वात घेऊन जातात यात शंका नाही. असाच उत्तम संगीताचा आणि कौटुंबिक मनोरंजनाचा मेळ असलेला ”श्री राम समर्थ” सिनेमा येत्या १ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विप्र एंटरटेनमेंटच्या अश्विनी माहेश्वरी आणि दिशादिपा फिल्म्सच्या सौ. दिपा प्रकाश सुरवसे यांची निर्मिती असलेला हा सिनेमा भारती झुंबरलाल राठी आणि संजय राठी यांनी प्रस्तुत केला आहे. दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ”श्री राम समर्थ” सिनेमाची मूळ संकल्पना विधीतज्ञ सौ विजया प्रवीण माहेश्वरी यांची आहे.
घराघरातील संस्कारांचा पाया असलेले “मनाचे श्लोक” याचे उदगाते राष्ट्रसंत रामदास स्वामी यांनी दिलेला अमूल्य ठेवा घराघरात गेल्या कित्येक पिढ्यांपासून जपला जात आहे. त्यांनी लिहिलेला ‘दासबोध’ ग्रंथ आजच्या दैनंदिन कठीण प्रसंगात मार्गदर्शक ठरतो. त्यांनी बलोपासना, नामस्मरणाचे महत्व समजावून दिले. त्यांनी घालून दिलेला आदर्श आणि मार्गदर्शन ”श्री राम समर्थ” सिनेमात उलगडणार आहे. लग्नातील ”सावधान” या शब्दामागील नेमका अर्थ समजावून घेणारा अवघ्या १२ वर्षाचा छोटा नारायण ते अफाट ज्ञान आणि रामरायाच्या भक्तीत आकंठ बुडून प्राप्त केलेली सिद्धी संत रामदास स्वामींच्या ठायी पाहायला मिळते. स्त्रियांचा आदर आणि महिला सबलीकरणाचे समर्थ खरेखुरे पुरस्कर्ते होते हे देखील सिनेमात पाहण्यास मिळते.
श्री राम समर्थ सिनेमाचे संगीत दिग्दर्शन संजय मराठे आणि महेश नाईक या जोडीने केले. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे तसेच नवोदित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका सौ मीना निकम यांच्या सुमधुर आणि एकमेकांशी पूरक असणाऱ्या आवाजात या सिनेमातील पाच गाणी सजली आहेत. आजच्या तरुणाईला आवडेल त्यांच्या पिकनिकची जान बनेल असं गायक अवधूत गुप्ते यांच्या एनर्जेटिक आवाजातील ”यू टर्न” हे गाणं सिनेमातील दोन पिढ्यांमधील दुवा आहे असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत श्री गणेशाची रामदास स्वामी रचित ”सुखकर्ता दुःखकर्ता” ही आरती वेगळ्या तालासुरात ऐकायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील चढलेल्या स्वरसाजाने या गाण्याला आलेली लकाकी सिनेमा पाहताना अनुभवता येईल.
स्त्री रूपाचा महिमा सांगणारी ”दुर्गे दुर्घट भारी” ही आरती निव्वळ कोरसमध्ये गायलेली सिनेमात पाहायला मिळणार आहे. राष्ट्रसंत रामदास स्वामी रचित ”सत्राणें उड्डाणें” ही मारुतीरायाची आरती गायक बाळासाहेब सावंत यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात स्वरबद्ध केली आहे. महाराष्ट्रातील विविध भागात वसलेल्या अकरा मारुतींचे दर्शन या सिनेमाच्या निमित्ताने घडतं. गीतकार बाबा चव्हाण लिखित गायक बाळासाहेब सावंत आणि गायिका सौ मीना निकम यांनी हे गाणं गायलं आहे. दासबोध ग्रंथातील २८ ओव्या सिनेमातील संवादांना नेमका अर्थ मिळवून देतात. याबाबत अधिक माहिती देताना सिनेमाचे संगीत दिग्दर्शक संजय मराठे आणि महेश नाईक म्हणाले, सिनेमाची धाटणी कुठेही बटबटीत वाटू नये यासाठी पारंपरिक संगीताला आधुनिकतेची जोड दिली आहे. खरंतर हेच मोठं आव्हान होतं. रामदास स्वामींचे शब्द आणि विचारसरणीस कुठेही धक्का न लावता संगीत देणं कठीण काम असल्याने त्याला वेळही बराच लागला. उदाहरण द्यायचं झालं तर या सिनेमातील ”सुखकर्ता दुःखकर्ता” आरतीसाठी एकूण आठ चाली तयार केल्या होत्या. रामदास स्वामींचा तो ऐतिहासिक काळ आणि आजचे एकूण वातावरण यांना एकत्र बांधेल असे पार्श्वसंगीतही करण्याचं आव्हानही आम्ही पेललं.
स्वच्छ परिसर आणि समृद्ध समाज ही चारशे वर्षांपूर्वी समाजात रुजवलेली संकल्पना आजही तितकीच महत्वपूर्ण ठरत आहे. अभिनेता शंतनू मोघे, अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, महेश कोकाटे, सौरभ गोखले, सयाजी शिंदे, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, विजयासुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि अनेक नवोदित चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहे. बहुचर्चित सिनेकलाकारांच्या उत्तम आणि खुमासदार अभिनयामुळे या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. हा सिनेमा रामदास स्वामींच्या चरित्रपटापेक्षा समाजातील सद्य परिस्थितीचे नेमके आणि मार्मिक वर्णन करणारा आहे. सिनेमात दाखविलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना उत्तम प्रशासन आणि प्रशासक कसे असावे याबद्दल नेमकं भाष्य करतात. कथा-पटकथा-संवाद प्रकाश जाधव, मनोज येरुणकर, विठ्ठल आंबुरे यांनी केलं आहे. छायांकन समीर आठल्ये, संकलन सुबोध नारकर, कला महेंद्र राऊत, नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी दिले आहे. बुद्धिजीवी व रामरायाचे निस्सीम भक्त असलेल्या राष्ट्रसंत रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा परिपूर्ण जीवनाचा मूलमंत्र देणारा आहे. रंजक तसेच उद्बोधक उबोधक आणि प्रेरणादायी सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याची उत्तम संधी येत्या १ नोव्हेंबर पासून प्रेक्षकांना मिळणार आहे.