राजकुमार तांगडे करतोय ‘चिवटी’!

सामाजिक जाणीव असलेला रंगकर्मी म्हणून राजकुमार तांगडेची ओळख आहे.

rajkumar

 

‘आकडा’ ही गाजलेली एकांकिका ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या गाजलेल्या नाटकातून रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवल्यानंतर लेखक आणि अभिनेता राजकुमार तांगडे आता चित्रपटाकडे वळला आहे.

‘चिवटी’ या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. सामाजिक जाणीव असलेला रंगकर्मी म्हणून राजकुमार तांगडेची ओळख आहे.

त्याने केलेल्या कलाकृतीतूनही त्याची सामाजिक, राजकीय समज दिसली आहे. आता त्यापुढे पाऊल टाकत तो चित्रपटाकडे वळला आहे. साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे का आणि त्यामागे होणारं राजकारण असं वेगळ्याच धाडणीचं कथानक घेऊन तो ‘चिवटी’ हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद  याचं लेखनही त्यानंच केलं आहे. या चित्रपटाचा मुहुर्त नुकताच बीड इथं झाला. चित्रपटाचं चित्रीकरण बीड, जालना आणि महाबळेश्वर इथं केलं जाणार आहे. प्रगती चित्र संस्थेच्या अजिनाथ ढाकणे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अभिनेता मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर, गौरी कोंगे, गजेंद्र तांगडे, मधुकर बिडवे, अशोक देवकर, देवकी  खरात आणि किशोर  उढाण आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत.

देवेंद्र गोलतकर छायालेखन करत असून, भगवान मेदनकर कार्यकारी निर्माते आहेत. जालन्यासारख्या भागात नाटकाचं वातावरण तयार करण्यात राजकुमारचा मोठा वाटा आहे.

आकडा या एकांकिकेतून त्यानं वीजचोरीचा प्रश्न हाताळला होता, तर ‘शिवाजी अंडरग्राउंड..’ च्या माध्यमातून त्यानं सध्याची सामाजिक परिस्थिती परखडपणे मांडली होती. त्यानं रंगभूमीवर केलेल्या कामाचं कौतुक झालं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून तो काय वेगळं भाष्य करतो, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Chivti Marathi Movie

Film Stars Milind Shinde, Sambhaji Tangde, Ashwini Bhalekar, Gauri Konge, Gajendra Tangde, Madhukar Bidve, Ashok Devkar, Devki Kharat, And Kishor Udhan.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here