मित्रांनो! आज ७ सप्टेंबर सुप्रसिद्ध हॉलिवूड, बॉलीवूड आणि मराठी अभिनेत्री, बो’ल्ड अन बिनधास्त राधिका आपटे हीच वाढदिवस. (जन्म : १९८५) राधिका आपटे बॉलीवूडमधल्या अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे जिचं आयुष्य फारच वेगळं आहे. मग ते सिनेजगतातलं असो किंवा खासगी. तिने नेहमीच इतरांहून वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला आहे. आज ७ सप्टेंबरला राधिका तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याशी संबंधित परंतु कुणाला फारशा माहीत नसलेल्या गोष्टी… खास तुमच्यासाठी.

राधिका आज सिनेजगतात सक्रिय असली तरी ती अशा कुटुंबातून आली जिथे अभिनयाची कोणतीही पाश्वभूमी नाही. राधिकाचे वडील डॉ. चारुदत्त आपटे हे पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचे चेअरमन आणि न्यूरोसर्जन आहेत. राधिकाच्या अभ्यासाबद्दल बोलायचे झाले तर ती अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती.

तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणित या विषयांत दुहेरी पदवी घेतली आहे. अभिनयाशिवाय राधिकाने भारतीय शास्त्रीय नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं आहे. तिने रोहिणी भाटे यांच्याकडून ८ वर्ष कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. तिने अनेक वर्ष थिएटरही केलं. थिएटर केल्यानंतर ती करिअर करण्यासाठी मुंबईत आली.

२००५ मध्ये ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून राधिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात ती शाहिद कपूरच्या बहिणीच्या भूमिकेत होती. पण या सिनेमातून ती फारशी कोणाला लक्षात राहिली नाही. २०११ मध्ये आलेल्या ‘शोर इन द सिटी’ या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली.

यानंतर तिने ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र २’ आणि ‘आय एम’ असे चित्रपट केले. काही चित्रपटामध्ये काम केल्यानंतर राधिका लंडनला गेली. तिने हे स्वत: मान्य केलं की लंडनमध्ये राहिल्यामुळे तिच्या आयुष्यात अमुलाग्र बदल झाला. तिची विचार करण्याची पद्धत बदलली. राधिकाची लंडनमध्ये संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी भेट झाली. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं.

एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं होतं की तिने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्नाच्या दिवशी तिने आजीची जुनी साडी नेसली होती. ती साडी अनेक ठिकाणांहून विरली होती. पण तरीही तिने लग्नासाठी तिच साडी नेसण्याचा निर्णय घेतला होता. राधिकाने ‘बदलापूर’, ‘पॅडमॅन’, ‘कबाली’, ‘फोबिया’, ‘मांझी: द माउंटन मॅन’, ‘पार्च्ड’, ‘अंधाधुन’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. हळूहळू तिला ओटीटी प्लॅटफॉर्मची नायिकादेखील म्हटलं जाऊ लागलं.

‘बदलापूर’, ‘पार्च्ड’ यांसारख्या चित्रपटात तिने अनेक बो’ल्ड सीनही दिले. तिच्या या सीनवरून अनेक वा’द निर्माण झाले होते. छोट्या भूमिका करूनही आपल्या नावाची छाप कशी सोडावी हे राधिका आपटेने दाखवून दिलं. मराठी, हिंदीशिवाय तिने तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली, आणि इंग्रजी भाषांमधल्या चित्रपटांमध्येही काम केलं.

राधिकाने सिनेसृष्टीत होणाऱ्या या कास्टिंग काउचबद्दलही खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने चित्रपटातील भूमिकेसाठी सेक्शुअल फेवरची मागणी कशी करण्यात आली तेही सांगितलं. एकदा जेव्हा ती चित्रपटाच्या सेटवर पोहोचली तेव्हा दक्षिणेतल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिच्या पायाला गुदगुल्या करण्यास सुरुवात केली. यानंतर राधिकाने त्याच्या कानशिलात लगावली होती. आमच्या संपूर्ण स्टार मराठीच्या टीमतर्फे राधिकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!