मराठी चॅनल वरील काही सिरीयल या उत्तम कथानक आणि सकस सादरीकरणाच्या जोरावर फारच कमी कालावधीत लोकप्रिय होतात आणि त्यातील कलाकारांनाही मोठा चाहता वर्ग लाभतो.

सध्या झी’ मराठीवरील अतिशय लोकप्रिय सिरीयल ‘माझा होशील ना’ मधील आदित्य (विराजस कुलकर्णी) आणि सई (गौतमी देशपांडे) ही जोडी मराठी प्रेक्षकांमध्ये आवडती झाली आहे. खरेतर आदित्य आणि सई हे जुने मित्र आहेत, आणि त्या दोघांच्या खऱ्या आयुष्यातील पहिल्या भेटीचा किस्सा मोठा गमतीदार आहे.

तर विराजस (सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा) तेव्हा अकरावीत होता. त्याच्या आणि सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री मृण्मयी देशपांडेच्या नाटकाचे काही प्रयोग पुण्यात होणार होते. त्यावेळी विराजस मृण्मयीच्या घरी नाटकाचा सेट बनवत होता.

तो बनवताना गौतमी त्याठिकाणी आली (गौतमी ही मृण्मयी देशपांडेची सख्खी बहीण) त्यावेळी गौतमीकडे तिचे पाळीव मांजर होते. विराजस सेट च्या कामात मग्न असतांना अचानक गौतमीच्या त्या पाळीव मांजराने विराजसच्या अंगावर उडी मारली. विराजस अर्थातच एकदम दचकला. आणि गौतमीला मात्र हसूच आवरत नव्हते. नंतर मात्र दोघेही हसू लागले. पहिल्यांदा विराजस आणि गौतमीची ओळख झाली ती अशी.

गौतमी बद्दल बोलतांना विराजस म्हणतो, ‘गौतमी ही उत्तम कवयित्री असून कविता करण्यासोबतच ती उत्तम गायिकाही आहे. तिला विविध प्रकारचे पुस्तके वाचनाची प्रचंड आवड आहे. आणि तोच आमच्या मैत्रीतील एक समान धागा आहे.

फक्त तिची एकच गोष्ट मात्र मला खटकते आणि ती म्हणजे गौतमीला अचानक कधीही पटकन हसू येतं. एखाद्या सीनचे शूटिंग सुरू असतांना सुद्धा तिला अचानकच हसू येते आणि मग मलाही हसायला येते आणि नंतर सेटवरचे आम्ही सगळेच खूप हसायला लागतो.’

गौतमी विराजस विषयी बोलतांना सांगते की, विराजसचा स्वभाव खूप जॉली आहे. तो नेहमीच भोवतालचे वातावरण आनंदी ठेवत असतो. त्याला लवकर राग येत नाही आणि सहसा तो चिडतही नाही. माझ्यामते ही त्याच्यातील एक चांगली गोष्ट आहे.

गौतमीला चिडवण्यासाठी कधीकधी विराजस तिचा मोबाईल घेतो आणि लवकर परत देत नाही आणि परत देताना मोबाईल त्याच्या हातातून निसटून पडल्यासारखा आभास निर्माण करतो, तेव्हा मात्र गौतमीला राग येतो. गौतमी आणि विराजस यांनी काही नाटकातून सुद्धा एकत्र काम केले आहे.

‘माझा होशील ना’ ही माझी पहिलीच सिरीयल असल्याने यात काम करताना मला खूप मजा येत आहे. माझ्या स्वभावातील खट्याळपणा, मिश्कीलपणा आदित्यच्या रोलमध्येही आणण्याचा मी प्रयत्न करत असतो.’ असे विराजस सांगतो

गौतमी सांगते, ‘मी करत असलेला सईचा रोल हा आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा आणि वास्तववादी आहे. सिरीयल मधील सई थोडी हट्टी, प्रभुत्व गाजवणारी श्रीमंत घरातील मुलगी आहे. त्यामुळे ती खरी, आजच्या काळातील वाटते.’

‘माझा होशील ना’ सिरीयल सुरू झाली आणि काही काळाने लगेच लॉकडाउन झाले. त्या काळात मग विराजस, गौतमी आणि काही कलाकारांनी या सिरियलचे शूटिंग आपापल्या घरातून केले होते. गौतमी तिच्या घरी पुण्यात होती. या दरम्यान तिने गाण्याचा रियाज केला. अनेक वर्षांनंतर, तिला, मृण्मयी, आई आणि बाबा अशा तिच्या सर्व कुटुंबीयांसमवेत तिला वेळ घालवायला मिळाला. ही जोडी आणि सिरीयल सध्या मराठी रसिकांमध्ये फारच लोकप्रिय आहे.