गेली १२ वर्षे सातत्याने महाराष्ट्रातील रसिकांचे भरभरून मनोरंजन करणारी, महाराष्ट्राची लाडकी वाहिनी म्हणून झी टॉकीज लोकप्रिय आहे. दर्जेदार चित्रपटांच्या बरोबरीनेच, महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा पुरस्कार वितरण सोहळा सुद्धा झी टॉकीज दरवर्षी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आपल्या लाडक्या कलाकारांना विजेता म्हणून निवडण्याची थेट संधी प्रेक्षकांना या सोहळ्याच्या निमित्ताने मिळते. यंदा सुद्धा हा उत्कृष्ट सोहळा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या सोहळ्यात प्रदान करण्यात येणाऱ्या पुरस्कारांची व नामांकनांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ११ विविध श्रेणींमधील पुरस्कार महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९ मध्ये देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने फेवरेट चित्रपट ‘फेवरेट अभिनेता’, ‘फेवरेट अभिनेत्री’, ‘फेवरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’ ‘फेवरेट गीत’ इत्यादी पारितोषिकांचा समावेश असणार आहे. ३ डिसेंबरपर्यंत, आपल्या लाडक्या कलाकारांना विजयी करण्याची संधी मिळणार आहे. आनंदी गोपाळ, टकाटक, ट्रिपलसीट, हिरकणी, ये रे ये रे पैसा २, खारी बिस्कीट, फत्तेशिकस्त अशा विविध विषयावरील चित्रपटांना ‘फेवरेट चित्रपट’ होण्यासाठी नामांकने मिळालेली आहेत.
विविध धाटणीचे दर्जेदार चित्रपट नामांकित ठरलेले असल्याने या स्पर्धेतील चुरस मोठी असणार आहे. सिनेमा आला, की त्यात खरा रंग भरणारी मुख्य पात्रं, अर्थातच नायक आणि नायिका हे ओघाने आलेच! ‘फेवरेट अभिनेता’ आणि ‘फेवरेट अभिनेत्री’ होण्यासाठीची स्पर्धा सुद्धा कलाकारांसाठी सोपी नाही. अष्टपैलू अभिनेता ललित प्रभाकर याला ‘आंनदी गोपाळ’ मधील अभिनयासाठी नामांकन मिळालेले आहे. ‘ये रे ये रे पैसा’ मधील संजय नार्वेकर, तर ‘मोगरा फुलला’ मधील स्वप्नील जोशी आणि ‘ट्रिपलसीट’ सिनेमातील अंकुश चौधरी या चॉकलेट हिरोंनादेखील आपल्या अभिनयासाठी नामांकित करण्यात आलेले आहे. याशिवाय प्रथमेश परब यानेही आपल्या ‘टकाटक’सिनेमातील अभिनयाच्या जोरावर नामांकन
मिळवलेले आहे. मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक अष्टपैलू कलाकार चिन्मय मांडलेकर याने ‘फत्तेशिकस्त’ मधून आपल्या अभिनयाने छाप पाडून नामांकन मिळवलेले आहे. हिरकणी सिनेमात मुख्य भूमिका केलेली सोनाली कुलकर्णी, ‘बंदिशाळा’ मधील मुक्त बर्वे, ‘ट्रिपलसीट’ मधील शिवानी सुर्वे, यांना ‘फेवरेट अभिनेत्री’ च्या श्रेणीत नामांकन मिळालेले आहे. अष्टपैलू अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सुद्धा ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमासाठी नामांकन मिळवलेले आहे. याशिवाय, ‘आनंदी गोपाळ’ मधील भाग्यश्री मिलिंद आणि ‘टकाटक’ मधील रितिका श्रोत्री या अभिनेत्री सुद्धा दिग्गजांना ‘टफ फाईट’ देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘खारी बिस्कीट’ मधील ‘तुला जपणार आहे’ व ‘खारी’, ‘हिरकणी’ मधील ‘शिवराज्याभिषेक’, ‘आनंदी गोपाळ’ मधील ‘;रंग माळियेला’ आणि ‘फत्तेशिकस्त’ मधील ‘तू जोगवा वाढ माई’ व ‘रणी फडकती लाखो झेंडे’ या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारुड घातले आहे. प्रेक्षकांची आवडती गाणी ठरू लागलेल्या या गीतांमधून
‘फेवरेट गीत’ होण्याचा मान कोण मिळवणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात, ‘फेवरेट स्टाईल आयकॉन’ आणि ‘पॉप्युलर फेस’ हे दोन पुरस्कार सुद्धा अत्यंत मानाचे ठरणार आहेत. हँडसम आणि तरुणींचे लाडके अभिनेते, अंकुश चौधरी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी आणि आकाश ठोसर ‘फेवरेट स्टाईल आयकॉन’ होण्यासाठी नामांकित करण्यात आलेले आहेत. तर, असंख्य तरुणांच्या दिलाची धडकन असणाऱ्या अभिनेत्री, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, वैदेही परशुरामी, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू, अमृता खानविलकर या वर्षातील ‘पॉप्युलर फेस’ होण्यासाठी स्पर्धा करत असलेल्या पाहायला मिळतील.
‘फेवरेट दिग्दर्शक’, ‘फेवरेट गायक’, ‘फेवरेट गायिका’, ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’,’फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ या श्रेणीमधील नामांकने सुद्धा ‘झी टॉकीज’ च्या साईटवर प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
या कलाकारांना विजयी करणे सुद्धा सर्वस्वी प्रेक्षकांच्या हातात असणार आहे. साईटवर आपल्या लाडक्या कलाकारांना वोट देऊन, प्रेक्षक विजयी करू शकतात. झी टॉकीज वाहिनीचे बिझनेस हेड बवेश जानवलेकरांनी सांगितले, ‘झी टॉकीज ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आणि त्यामुळेच या वाहिनीला चित्रपट वाहिन्यांमध्ये प्रेक्षकांनी एक नंबर ला नेऊन ठेवले. आमचा महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा लोकप्रिय सोहळा गेली १० वर्षे केवळ निवडक आणि उत्कृष्ट कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर प्रेक्षकांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून प्रेम दिले. यंदा हा सोहळा ११व्या वर्षात पदार्पण करत आहे. या पुरस्काराचे नामांकन जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे यावर्षी देखील प्रेक्षक त्यांच्या लाडक्या कलाकारांना भरभरून मतं देऊन विजयी करतील अशी मी आशा करतो.
मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रेक्षकांचा लाडका पुरस्कार सोहळा डिसेंबर महिन्यात संपन्न होणार आहे. महाराष्ट्राचं ‘फेवरेट’ कोण ठरतं याचं उत्तर मिळवण्यासाठी सगळ्यांनाच आता काही
काळ वाट पाहावी लागणार आहे. अर्थात, फेवरेट ठरवण्याचे सर्वाधिकार रसिकांकडेच असल्याने,
तुम्हीदेखील कामाला लागा.!!!