इच्छा तिथे मार्ग ही जुनी म्हण आपण वाचलीच असेल.  मित्रांनो अशाच एका जिद्दी आलम पुढारी ची कहाणी आज आपण वाचणार आहोत. कायम दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली या गावचा आलम शेख नावाचा तरुण बेरोजगारीने अन रोजच्या घरच्या कटकटीने, त्रस्त झाला होता. घरची प्रचंड गरिबी, आई-वडील ऊसतोड कामगार त्यात ही रोजची कटकट असल्याने एकेदिवशी तो आजीच्या पिशवीतले पाचशे रुपये घेऊन मुंबईला पळून गेला.

जाताना नगर वरून रेल्वेने विनातिकीट गेला. गावाकडचे लोकं मुंबईत गेल्यावर आमदार निवासात, मंत्रालयाच्या परिसरात राहतात हे त्याने ऐकलं होतं पण कोणीच ओळखीचे नसल्याने त्याने दोन-तीन रात्री मरीन ड्राईव्हच्या आसपास रस्त्यावरच काढल्या. दोन दिवस अंघोळ नसल्याने तो जवळच्या सुलभ शौचालयाकडे गेला, खिशातले पैसे ही संपत आले असल्याने व घालायला दुसरे कपडे ही नसल्याने आलम अगोदरच टेन्शन मध्ये होता. अशात समोर आरशात बघितल्यावर त्याला गळ्यात असलेल्या छोट्या सोन्याच्या लॉकेटची आठवण झाली.

ते मोडून मग त्याने स्वतःला एक शुभ्र ड्रेस घेतला. पुन्हा आणखी चार दोन दिवस कोणत्या पुढाऱ्यांकडे ड्रायव्हर चे काम मिळते का बघितले. पण लायसन नसल्याने ते ही जमलं नाही. पण मंत्रालयाच्या आवारात फिरत असताना आलमच्या एक गोष्ट लक्षात आली की इथले जवळपास सगळे आमदार व येणारे भरपुर लोकं हे कडक, शुभ्र कपड्यात आहेत, आपण यांनाच कपडे विकु शकतो की.मग त्याने लॉकेटच्या उरलेल्या पैशातून काही कापडं खरेदी केली. त्याच दिवशी संध्याकाळ पर्यंत फिरून त्याने तीन हजाराचे कापडं पाच हजाराला विकले.

पहिल्याच दिवशी आलम चा आत्मविश्वास वाढल्याने तो पुन्हा कापडं विकत घेऊन विकायला लागला. असं करत करत थोडेफार पैसे जमा झाल्यावर अन काही दिवस झाल्यानंतर तो गावाकडच्या लक्ष्मण लाड नावाच्या मित्राच्या मारुती गाडीत कपडे विकायला लागला. हळूहळू करत त्याने जवळच एक गाळा भाडयाने घेऊन दुकान वाढवलं. आज घडीला तो राज्यतल्या अनेक आमदारांना, मंत्र्यांना कपडे पुरवतो. प्रेमळ व बोलका स्वभाव असलेल्या आलम चे नाव देखील लोकांनी आलम पुढारी ठेवले आहे. आपल्या या कामातून त्याची अनेक नेत्यांसोबत, अधिकारी वर्गासोबत चांगली ओळख झाली असुन त्याचा त्याला आणखी फायदा झाला.


उद्या घालायला कपडे नाहीत या विवंचनेत असणारा आलम आज एका कपड्याच्या दुकानाचा मालक आहे. त्याची ही धडपड पाहुन मंत्रालया जवळच्या आकाशवाणी आमदार निवासाखाली त्याला आमदार बाबजानी दुरानी साहेब व विनोद तावडे तावडे साहेबांच्या मदतीने सरकार ने गाळा ही उपलब्ध करून दिला आहे.  एकेकाळी बेरोजगार असलेल्या आलम ने आता इतर काही मित्रांना ही रोजगार दिलाय. आज त्याचं मंत्रालयाच्या आवारत पुढारी वस्त्र भांडार दिमाखात उभं आहे. पण एवढ्यावरच न थांबता आणखी चार-पाच शहरात आपले दुकानं असावीत यासाठी तो प्रयत्न करतोय. त्याच्या या जिद्दीला, प्रवासाला नक्कीच सलाम करण्यासारखं आहे. स्टोरी आवडल्यास नक्की शेअर करा.

लेखक चांगदेव गिते – 9665875815
आलम शेख  पुढारी वस्त्रभंडार – 8888448867