अगदी सहज उपलब्ध होणारी कोरफड बऱ्याच वेळेला दुर्लक्षित केले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का ही कोरफड तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? कोरफड ही मुळात थंड स्वरूपाची असते. भाजलेल्या जखमेवर प्राथमिक उपचार म्हणून ही अत्यंत प्रभावी आहे. थंडाव्यासोबतच मॉइश्चरायझर म्हणून ही कोरफडीचा गर काम करतो. बऱ्याचदा पोटामध्ये असणाऱ्या अल्सरमुळे त्रास होतो. ह्यावर कोरफडीचा गर गुणकारी आहे. हा अल्सर कमी करण्यास मदत करून पाचनक्रिया वाढवतो.

आपल्या सर्वांसाठीच आपले दात ही प्रिय गोष्ट आहे. मोत्यासारखे चमकदार दात प्रत्येकाला आवडतात पण ह्या दातांनाच जर त्रास असेल तर मात्र सर्वांचीच त्रेधातिरपीट उडते.

ह्यावर देखील कोरफड एक रामबाण उपाय आहे. कोरफड प्लाक कमी करून दातांचे आरोग्य वाढवण्यास मदत करते. केस आणि चेहऱ्यासाठी तर कोरफड एक वरदान आहे.

मऊ, मुलायम केसांसाठी कोरफडीचा गर उपयुक्त आहे. तर कोरफडीच्या गरामध्ये हळद मिसळून हा लेप चेहऱ्याला लावल्याने पिंपल्स कमी होण्यास, तजेलदार त्वचा मिळण्यास मदत होते. शिवाय हा गर मॉइश्चरायझरचे देखील काम करतो.

मध आणि कोरफडीचे सेवन भूक वाढवण्यास मदत करते. कोरफडीच्या रसाचे सेवन ऍसिडिटी आणि कॉन्स्टिपेशन सारख्या समस्या दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

कोरफडीच्या गरामध्ये असलेले व्हिटॅमिन्स, अमिनो ऍसिडस्, फायटोन्यूट्रियनट्स शरीरात निर्माण होणारे विषारी पदार्थ कमी करण्यास मदत करतात. शिवाय चयापचय क्रिया वाढवते त्यामुळे वजन कमी करण्यासदेखील मदत होते. कोरफडीच्या गरापासून बनवलेला ‘काळा वोळ’ हा स्त्रियांसाठी मासिक पाळीमध्ये गुणकारी आहे.

कोरफड स्नायूंमधील ताण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे संधीवाताच्या रुग्णांना ह्यामुळे आराम मिळतो.
कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन A, B1, B2, B3, B6, C, असते शिवाय फोलिक ऍसिड, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम इ. असते.

कसा बनवाल कोरफडीचा रस? कोरफडीच्या पानांमध्ये गर असतो. पानांवर असणारी हिरवी साल आधी काढून आतील गर काढून घ्यावा. हा गर मिक्सरमधून काढून गळून घ्यावा. कडवटपणा कमी करण्यासाठी मधाचा वापर करावा.

3-4 चमचे रोज कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात. लक्षात ठेवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोरफडीचे सेवन करू नये. मूळव्याध, किडणीसंबंधी आजार असतील तर कोरफडीचे सेवन करू नये.

काही लोकांमध्ये ह्याच्या सेवनाने पोटात दुखणे, अतिसार, लघवीमध्ये रक्त, स्नायूंमध्ये अशक्तपणा ह्यांसारखे दुष्परिणाम ही दिसू शकतात.

भक्ती संदिप
(Nutritionist in Foodvibes Grocers)