अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज यांनी निर्मिती केलेला “येरे येरे पैसा २” हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. येरे येरे पैसा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर आता लेखक दिग्दर्शक हेमंत ढोमेनं “येरे येरे पैसा २”या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं हेमंतशी साधलेला संवाद…
१. “ये रे ये रे पैसा १” यशस्वी झालेला असल्याचं तुला दिग्दर्शन करताना दडपण होतं का?
– शंभर टक्के दडपण होते. कारण एका यशस्वी चित्रपटाचा पुढचा भाग करताना दडपण येणं स्वाभाविकच आहे. पण संपूर्ण टीम आणि माझ्या निर्मात्यांमुळे हे शक्य झालं. मी मला हवा असलेला चित्रपट करू शकलो, याचा आनंद आहे.
२. “येरे येरे पैसा २” ला नेमकं सिक्वल म्हणायचं, की आधीच्या चित्रपटातल्या काही व्यक्तिरेखा घेऊन संपूर्ण नवीन कथानक आहे?
– “येरे येरे पैसा २” हा संपूर्णपणे नवीन कथानकावर आधारित आहे. अण्णा, टेण्या, रंजना, जान्हवी मुजुमदार या अधीच्या पात्रांना तसंच ठेवून ही नवीन कथा रचली आहे. या कथानकात अण्णा मुख्य आहे आणि तो नवीन टीम उभी करतो.
३. एवढी मोठी स्टारकास्ट घेऊन चित्रपट करण्याचा अनुभव कसा होता?
– खूप धमाल आली. प्रत्येक कलाकाराचा विनोदाचा वेगळा सेन्स आहे, वेगळं टायमिंग आहे. प्रत्येकाची ताकद वेगळी आहे. त्यामुळे कथानकाला छान आणि वेगळे पदर आले. तसंच सगळेच कलाकार जवळचे मित्र असल्यामुळे चित्रीकरणादरम्यान जास्तच मजेशीर पद्धतीने काम झालं.
४. “येरे येरे पैसा २” च्या संगीताची खूप चर्चा आहे. अश्विनी ये ना हे गाणं रिक्रिएट करणं आणि एकूणच अल्बमविषयी काय सांगशील?
– चित्रपटाच्या संगीतात खूप प्रयोग केले आहेत. टिपिकल साउंड बाजूला ठेवून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलाय. ट्रॉय आरिफ या माझ्या मित्रांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीतही त्यांचंच आहे. अश्विनी ये ना हे खूप गाजलेलं गाणं रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रयत्न लोकांना खूप आवडतोय, याचा आनंद वाटतो. उन दोस ट्रेस हे स्पॅनिश गाणं केलंय, जे एक सेलिब्रेशन साँग आहे. प्रत्येकाला नाचायला लावेल असं हे गाणं आहे. टायटल साँग मिका सिंगनं गायलंय. गीतकार क्षितिज पटवर्धनने दोन धमाल गाणी लिहिली आहेत. एकूण या चित्रपटाचा म्युझिक अल्बम खूप धमाल आहे. आमचा प्रयत्न, आमचं संगीत लोकांना आवडतंय, याचं समाधान वाटतं.
५. मराठी चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी नेमकं काय गरजेचं आहे असं तुला वाटतं?
– मराठी चित्रपट यशस्वी करायचा असेल, तर त्याचं काहीही गणित नाही. लोकांना आपला चित्रपट भिडला, तर तो यशस्वी झाला आणि तो भिडणंच महत्त्वाचं आहे.