आपल्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा व आपले काम, व्यवसाय देशभरात कुठेही करण्याचा अधिकार दिला आहे. जर का राज्यकर्त्यांनी समाजासोबत काम केलं तर ही समस्या सुटण्यासाखी नक्कीच आहे. गावातून लोकं शहरांत का जातात? खरंतर त्यांना गावातच रोजगार उत्पन्न करून दिला तर स्थलांतराचा प्रश्नच निकाली निघेल. परंतु यासाठी अभ्यासू, तत्वनिष्ठ व पोटतिडकीने काम करणारी माणसं हवी. गावातले प्रश्न तिथेच मिटवले तर गावात सुधारणा होऊ शकते व शहर विरुद्ध गाव ही समस्या निष्कासित होऊ शकते. अशाच एका गावाची गोष्ट, जे एका तरुणाच्या प्रयत्नाने कसे पुढारते, ‘गाव पुढे आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे.
एक तरुण अचानकपणे एका गावात राहावयास येतो. आपली हुशारी, मेहनतीने व गावकऱ्यांच्या साथीने त्या गावाला प्रगतीपथावर नेतो. त्याच्या येण्यानंतर त्या गावात जणू नवचैतन्य नांदू लागते. गावात खूप प्रगती होऊ लागते. गावकऱ्यांच्या अनुषंगाने सुधारणा होऊ लागतात. गावातील भांडणतंटे दूर होतात. गावात आर्थिक सुबत्ता नांदू लागते. एके दिवशी तो तरुण अचानक गायब होतो व गावात चमत्कार होऊ लागतात. गावात भली मोठी फॅक्टरी उभी राहते, संपन्नता येते, त्या तरुणीच्या व इतरांच्या बँकेतील कर्ज फेडले जाते, अशा एक ना अनेक जादुई गोष्टी घडू लागतात. आश्चर्यचकित झालेले गावकरी विचारपूस करतात तेव्हा कळते की हे सर्व गर्भश्रीमंत अण्णासाहेब भोसले यांनी आपला मुलगा अविनाश भोसले याच्या सांगण्यावरून केले आहे. हे सर्व का व कसे होते हे ‘गाव पुढे आहे’ या चित्रपटातून मनोरंजकपणे मांडण्यात आले आहे.
हा चित्रपट एक सामाजिक संदेशही देऊ पाहतो. पुढे गाव आहे की गाव पुढे आहे या शक्यतांचा विचार दिग्दर्शकाने सुबुध्दतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. ‘गाव पुढे आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची प्रस्तुती मीना शमीम फिल्म्सची आहे. पटकथा व संवाद मुन्नावर भगत यांचेच असून संगीत दिले आहे रितेशकुमार नलिनी व रफिक शेख यांनी. गीते लिहिली आहेत अभिषेक कुलकर्णी, मुन्नावर भगत व इलाही जमादार यांनी. छायाचित्रणाची जबाबदारी अरविंदसिंह पुवार यांनी उचलली असून पार्श्वसंगीत दिले आहे सलील अमृते यांनी. चित्रपटात हँडसम स्वप्नील विष्णू व गोड, सुंदर अभिनेत्री पूजा जयस्वाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यातील ‘केमिस्ट्री’ वाखाणण्याजोगी असून चित्रपटातील गाणी खूपच श्रवणीय झालीयेत.
‘गाव पुढे आहे’ मध्ये रहस्य आणि उत्कंठा यांचे मिश्रण असणार असून हा चित्रपट येत्या २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.