टोर्ल, हँडसम आणि साध्या सरळ लूकने आजही तरुणींच्या हृदयावर राज्य करणारा चिन्मय उदगीरकर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतो. तर आपल्या सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी सर्वच प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री प्रीतम कांगणे तिच्या दिलखेचक अदा घेऊन लवकरच ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटातून अभिनेता चिन्मयसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात चिन्मय आणि प्रीतमची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. चिन्मय आणि प्रीतम हे दोघेही ‘वाजवूया बँड बाजा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात दोघांच्या लव्हस्टोरीसह हास्यकल्लोळही पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटातील संजूची भूमिका चिन्मय साकारणार असून दिव्याच्या भूमिकेत प्रीतम दिसणार आहे. या चित्रपटात दोघांच्या जगण्याच्या वाटा वेगळ्या आहेत आणि याच वाटा वेगळ्या असल्याचे भान जेव्हा येते तेव्हा त्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजतो आणि एका मर्यादेनंतर खरा अर्थ समजल्यानंतर त्या प्रेमाचे नक्की काय होते? याबद्दलची उत्सुकता सर्वच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. शिवाय हे सर्व घडत असताना चिन्मय आणि प्रीतमच्या आयुष्यात नेमके काय बदल होतात हे ही जाणून घेणे तितकेच रंजक ठरेल.

 

अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे, अमोल कागणे निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा बहुचर्चित ‘वाजवूया बँड बाजा’ चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यासाठी येत्या २० मार्च २०२० ला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती जमती आणि हास्याचा विस्फोट घडवून आणणारा हा प्रेमकथेवर आधारित असलेला हा ‘वाजवूया बँड बाजा’ चित्रपट येत्या २० मार्चला जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.