मित्रांनो!आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध भक्तांना खूप आधीपासून लागलेले असतात. गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा आणि गणेश विसर्जन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात गणपतीची माहिती प्रत्येकाला आहे. एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. जितक्या उत्साहाने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन होतं. सर्वांकडून गणेश चतुर्थी शुभेच्छा दिल्या जातात. तितक्याच भावनात्मकरित्या गणरायाला निरोपही दिला जातो.
यंदाच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी दि. १० सप्टेंबर २०२१ आहे. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी ११ दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. भगवान शंकर आणि पार्वती पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आद्य देवता गणपतीची स्थापना करून पूजा केली जाते. तसंच हिंदू धर्मात भगवान श्रीगणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. कोणतंही कार्य असल्यावर सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपती विघ्नहर्ता आहे. गणपतीची अनेक नावं आहेत त्यापैकीच हे एक नाव. विघ्नहर्ता अर्थात संकटाचं हरण करणारा असं आहे. म्हणून प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते. तसंच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला.
श्रीगणेश चतुर्थीची कथा: हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. असं मानलं जातं की, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेच गण+पती = गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हा दिवस चार्तुमासात येतो. चार्तुमास म्हणजे सणावारांची पर्वणीच.
श्रीगणेश जन्म आख्यायिका : एके दिवशी पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते. पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली. भगवान शंकर काही वेळाने तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर सं’तप्त झाले आणि त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्या सं’तापल्या. ते धडावेगळं शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव अगदी ब्रम्हदेवापासून सगळे देव पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. पण पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नाही. तेव्हा शंकर देव आपल्या गणाला आदेश देतात की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याचं शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पुतळ्याला लावले आणि त्या मूर्तीला जिवंत केले. हा पार्वतीचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. शंकर देवाने त्याला गणाचा ईश म्हणेज देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता. त्यामुळे चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे.
श्रीगणेश चतुर्थी व हरतालिका व्रत : गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं. हे व्रत कुमारिका चांगला पती मिळावा म्हणून तर सुवासिनी आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात. या दिवशी शंकर देव आणि पार्वती देवीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी निर्जळ व्रत करून हा उपास गणेश चतुर्थीला सोडला जातो. गणपतीच्या विसर्जनासोबतच या व्रताच्या पूजेचेही विसर्जन केले जाते. या दिवशी खास हरतालिका शुभेच्छा कुमारिकांना दिल्या जातात.
श्रीगणेश चतुर्थी पर्व : गणेश चतुर्थीला गणरायाचं आगमन होतं आणि सुरूवात होते ती गणेशोत्सवाच्या पर्वाला. पाहूया गणेश चतुर्थी म्हटल्यावर काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. त्या जाणून घेऊयात.
श्रीगणेश प्रतिष्ठापना आणि पूजा : गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक मंडळाच्या मंडपात आणली जाते. पंचांगातील मुहूर्ताप्रमाणे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नेवैद्य इ. सोळा उपचारांनी षोडशोपचारे गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला आवडणारी लाल जास्वंदीची फुलं, शमी आणि दुर्वा तसंच विविध पत्रीपानं या पूजेमध्ये वापरली जातात. या दिवशी गणपतीची पूजा झाल्यावर उकडीच्या मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीसोबतच त्याचं वाहन असलेल्या मूषक म्हणजेच उंदराचीही स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीला सुरू होणारा हा उत्सव १० दिवसानंतर अनंत चतुर्दशीला संपतो. तेव्हाच गणपतीचं विसर्जनही केलं जातं.
गणपतीचा नेवैद्य मोदक : गणपतीला सर्वात प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे मोदक. गणपतीला ११ किंवा २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. हे मोदक नारळाचं सारण आणि तांदळाच्या उकडीने तयार केला जातात किंवा तळणीचे ही मोदक केले जातात. आजकाल तर मोदकांमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. गणेश चतुर्थीच्या प्रचलित आख्यायिकेप्रमाणे एकदा गणपती चतुर्थीला आवडते मोदक खाऊन आपल्या आवडत्या वाहनावरून उंदराच्या पाठीवरून जात होता. तेव्हा वाटेत साप पाहून उंदीर घाबरला आणि भीतीने थरथरू लागला. यामुळे गणपती उंदरावरून खाली पडला. त्याच्या पोटातून मोदक बाहेर आले. गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला. हे दृश्य पाहून चंद्र हसला. हे पाहून गणपतीने चंद्राला शाप दिला की, चतुर्थीला कोणीही तुझे दर्शन घेणार नाही. जो तुला बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल. अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे आजही लोकं चतुर्थीला चंद्राकडे पाहात नाहीत.
दुर्वा : गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते. कारण बाप्पाला दुर्वा फारच प्रिय आहेत आणि त्यामुळे गणपती प्रसन्न होतो. गणपतीला नेहमी 21 दुर्वांची जुडी प्रामुख्याने वाहिली जाते. गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहिल्या जातात त्यामागेही एक आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या एका असुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छाद मांडला होता. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाऱ्हाणे घालण्यात आले. गणपतीने त्या अनलासूराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला. पण त्या राक्षसाला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग सुरू झाली. काही केल्या ती थांबेना. यावर कश्यप ऋृषींनी बाप्पाला दुर्वांचा रस प्यावयास दिला. तो प्राशन केल्यावर गणपतीच्या पोटातील आग थांबली आणि तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडत्या झाल्या. तेव्हापासून गणपती पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात.
जास्वंद : दुर्वांप्रमाणेच गणपतीला प्रिय आहे ते जास्वंदाचं लाल फूल. कारण गणपतीचा वर्ण शेंदरी किंवा लाल आहे. त्यामुळे गणपती पूजेत जास्वंदाच्या लाल फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गणपतीला जास्वंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो.
गणपतीच्या आरती : सुखकर्ता दुःखहर्ता… ही गणपतीची आरती सगळीकडे सर्वप्रथम म्हटली जाते. ही आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे. गणेश चतुर्थीला घराघरात ही आरती ऐकू येते.
महाराष्ट्रातील गणेश चतुर्थी : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. पेशव्यांच्या काळापासून गणेशोत्सव घरगुती उत्सवाच्या स्वरूपात साजरा करत असल्याचे उल्लेख आहेत. लोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या काळात समाजातील एकी वाढण्याकरिता या उत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. तेव्हापासून गणेशोत्सव हा घरगुती आणि सार्वजनिकरित्या साजरा केला जातो. महाराष्ट्रासोबतच भारतातही या गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो.
भारताबाहेरील गणेश चतुर्थी : गणपती या देवतेची लोकप्रियता जगभरात आढळते. भारतासोबतच विदेशातही गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातून गणपतीच्या मूर्त्या विदेशात पाठवल्या जातात. तिथे त्यांची प्रतिष्ठापना करून गणेश चतुर्थी पारंपारिकरित्या उत्साहात साजरी केली जाते. तिथेही खास गणेश चतुर्थीला मोदकांचा प्रसाद दाखवून षोडशोपचारे पूजा केली जाते.