मित्रांनो!, आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की, उचलली जीभ अन लावली टाळ्याला. आजकाल सोशल मीडियावर उठसुठ कोणावरही तोंडसुख घेणाऱ्यांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. आपले प्रोफाईल लॉक करुन मोठमोठ्या सेलिब्रिटींवर अश्लील कमेंट करणारे अनेकजण आपण आपल्या आजूबाजूला पाहतोच. परंतु अशाच एका अतिशहण्या ट्रोलरला असे करणे चांगलेच महागात पडलेय. कसे?… जाणून घ्या.

मित्रांनो!, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर वीणा आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत आहे. त्यामुळेच तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे वीणादेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. मात्र, अनेकदा तिला ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो. अलिकडेच वीणाने तिचे काही फोटो शेअर केले होते. परंतु, या फोटोवर एका युजरने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषेत टीका केली असून या नेटकऱ्याला वीणा आणि शिव ठाकरेने चांगलीच अद्दल घडवली आहे.

तर झाले असे की, अलिकडेच वीणाने लाल रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. वीणाचे हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र, एका नेटकऱ्याने अश्लील भाषेत तिच्यावर टीका केली. विशेष म्हणजे वीणा व शिवने या ट्रोलरला चांगलेच खडे बोल सुनावले असून या व्यक्तीने चक्क तासाभरात वीणाची जाहीरपणे माफी मागितली आहे. या विषयीचा एक व्हिडीओदेखील वीणाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“तुमच्याकडे नैतिकता आहे का? असे प्रश्न मी खपवून घेणार नाही. या व्यक्तीने मला माझा रेट विचारला आणि त्यानंतर लगेचच मेसेज डिलीट केला. ज्यामुळे त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊ शकले नाही. एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणे किंवा ट्रोल करणे हे केवळ बेकायदेशीरच नाही. तर, त्यामुळे संबंधित व्यक्तीला मानसिक त्रास होऊ शकतो”, असं वीणा म्हणाली.

पुढे ती म्हणते, “तुम्ही पर्सनलवर (डीएम) वाट्टेल तो मेसेज केला तर ते कोणाला समजणार नाही असं जर का वाटत असेल तर लक्षात ठेवा मी अशा व्यक्तींना सोडणार नाही. थॅक्यू शिव ठाकरे. तसंच या संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आणि त्याला शिक्षा करण्यासाठी माझ्या इन्स्टा परिवारातील ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आभार. “@satyajit_12333 या युजरने वीणाच्या पोस्टवर अश्लील कमेंट केली होती. त्यामुळे शिव ठाकरेने या संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याला जाहीरपणे वीणाची माफी मागण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर त्याचा व्हिडीओदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला.

“मुलींवर काहीही कमेंट कराल आणि त्याची कुणीही दखल घेणार नाही हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. अवघ्या एका तासात सगळी माहिती मिळवली म्हणजे विचार करा. परत असं काही झाल्यास त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील”, असा इशारा शिव ठाकरे याने दिला आहे. दरम्यान, संबंधित प्रकारानंतर या तरुणाने व्हिडीओच्या माध्यमातून वीणाची माफी मागितली आहे. सोबतच त्याचा युजर्स आयडीदेखील बदलला आहे. या धाडसाबद्दल शिव आणि वीणाचे चाहते यांच्यासह अनेक नेटकरी त्यांचे कौतुक करतांना दिसत आहेत.