मित्रांनो!, सध्या अफगाणिस्तानबद्दल जगभरात चिंता आहे. तालिबान्यांनी संपूर्ण देश काबीज केला आहे. तेथील राष्ट्रपती देश सोडून पळून गेले आहेत. तेथील लोकांनी यापूर्वी तालिबानचे राज्य पाहिले आहे. तालिबानचे शासन सर्व प्रकारच्या निर्बंधांद्वारे आणि कट्टर इस्लामिक पद्धतीने चालवले जाते. स्त्रियांसाठी आयुष्य नरक बनते. त्यांना बुरखा घालून आणि घरातील कोणा पुरुषा सोबतच बाहेर जाण्याची परवानगी आहे.

ज्यांना शांततापूर्ण जीवन जगायचे आहे, त्यांना अफगाणिस्तानातून पळून जायचे आहे. काबूल विमानतळावर देश सोडून जाण्यासाठी जी अफरातफरी निर्माण झाली ती जगाने पाहिलीय. अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जामुळे बॉलिवूडही चिंतेत आहे. अनेक स्टार्सनी अफगाणिस्तानच्या स्थितीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

आश्चर्य म्हणजे अफगाणिस्तानमध्ये लोक हिंदी चित्रपट खूप पाहतात. अमिताभ बच्चन, सलमान, शाहरुखसह अनेक स्टार्स तिथे खूप लोकप्रिय आहेत.आपल्याकडील अनेक बॉलिवूड स्टार्स हे मूळ अफगाण वंशाचे आहेत. त्याचे पूर्वज अफगाणिस्तानातून भारतात आले होते आणि इथेच राहिले. जाणून घेऊ कोण आहेत ते…

सलमान खान – बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा अफगाण वंशाचा आहे. त्याचे पूर्वज अलकोझाई पश्तून होते. अलकोझाई हा युसूफझाई समाजाचा एक भाग मानला जातो. सलमानचे अफगाण मूळ त्याच्यावर लिहिलेल्या बीईंग सलमान या पुस्तकात उघड झाले आहे. 18 व्या शतकात त्यांचे पूर्वज खैबर फख्तुनबा येथील मालाकांडमधून भारतात आले आणि मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये स्थायिक झाले.

मध्य प्रदेशातील मल्हारबा होळकर सरदारांनी त्या पूर्वजांना आश्रय दिला होता. सलमानचे आजोबा इंदूरचे पोलीस उपायुक्त होते आणि वडील सलीम खान चित्रपटांचे प्रसिद्ध कथाकार झाले. सलीम खान यांनी डोगरा राजपूत असलेल्या सुशीला चरक म्हणजेच सलमा खानशी लग्न केले. त्यामुळे सलमान खानचे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांनुसार पालनपोषण झालेय.

फिरोज खान – प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान देखील अफगाण वंशाचा होता. फिरोज खानचे वडील सादिक अली खान अफगाणिस्तानच्या गझनी येथे राहत होते, तर अभिनेत्याची आई इराणची होती. फिरोज खान एक अफगाण पश्तून होता. त्याचे वडील गझनीहून भारतात आले आणि बंगलोरमध्ये स्थायिक झाले. फिरोज खानचे नेहमीच अफगाणिस्तानवर प्रेम होते आणि म्हणूनच त्याने आपल्या पूर्वजांच्या भूमीवर जाऊन धर्मात्मा आणि जानशीन सारख्या चित्रपटांचे चित्रीकरण केले होते.

फरदीन खान – फिरोज खानचा मुलगा फरदीन खान देखील बॉलिवूड अभिनेता आहे. या दिवसात त्याची कारकीर्द संपल्यात जमा आहे. फिरोज खानने सुंदरी नावाच्या एअर होस्टेसशी लग्न केले. फरदीन खान फिरोज आणि सुंदरीचा मुलगा आहे. फरदीन जानशीन चित्रपटाच्या बहाण्याने अफगाणिस्तानातील त्याच्या पूर्वजांच्या भूमीवरही गेला आहे.

संजय खान – 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता संजय खान देखील अफगाणी आहे. संजय खान फिरोज खानचा धाकटा भाऊ आहे आणि त्याचे पूर्ण नाव शाह अब्बास खान आहे. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने आपले नाव बदलून संजय ठेवले होते. संजय खानचा मुलगा झायद खाननेही चित्रपटांमध्ये काम केले. त्याचवेळी त्यांची मुलगी सुझान खान हिचा विवाह हृतिक रोशनसोबत झाला होता.

कादर खान – अभिनेता कादर खानचा जन्म अफगाणिस्तानच्या काबूल शहरात झाला होता. त्याचे वडील अब्दुल रहमान खान कंधारचे रहिवासी होते, तर आई बलुचिस्तानची होती. कादर खान हा काकर जमातीचा पश्तून होता. काही वर्षांपूर्वी त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले होते. कादर खानचे बालपण मुंबईतील कामाठीपुरा येथे गेले.

वरिना हुसेन- लव्ह यात्री या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात करणारी वरिना हुसेन देखील अफगाणिस्तानची आहे. तिचा जन्म 23 फेब्रुवारी 1986 रोजी काबुलमध्ये झाला. वरिनाने प्रथम भारतात मॉडेलिंग केले आणि नंतर ती बॉलिवूडमध्ये पोहोचली. वारिना अनेकदा अफगाणिस्तानला जाते. गेल्या वर्षीही ती अफगाणिस्तानला गेली होती. तेथे ती महिला परिषदेच्या जनरल झाकीया वर्दकला भेटायला गेली होती.

अर्शी खान – बिग बॉस फेम अर्शी खान देखील अफगाणिस्तानची आहे. जेव्हा ती चार वर्षांची होती, तेव्हा तिचे आईवडील भारतात आले आणि भोपाळमध्ये स्थायिक झाले. आता त्याच्या कुटुंबाला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.