मित्रांनो!, भारतामध्ये घरोघरी पाहिली जाणारी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही लोकप्रिय मालिका गेल्या काही काळापासून संघर्षांचा सामना करत आहे. आतापर्यंत मालिकेतील अनेक कलाकार देखील बदलले आहेत. दयाबेन आणि बबिताजी ही या शोची मुख्य पात्रं शो सोडून गेलेली आहेत. दुसरीकडे, नट्टूकाका सुद्धा शूटिंगमध्ये नाहीत. दयाभाभी परत येतील याचीही ही काही खात्री नाहीय.

मात्र, आता एक नवीन बातमी समोर आली आहे. या मालिकेत एक नवीन पात्र दाखल झाले आहे. तारक मेहताच्या बॉसच्या सेक्रेटरीचे पात्र मालिकेत नव्याने जोडले गेले आहे. ज्यामुळे सिरीयलमध्ये जरा नवीन मनोरंजन दिसणार आहे. कारण कमी पात्रांमुळे शोच्या टीआरपीमध्ये खूपच फरक पडला होता.

सध्या मालिकेत तारक मेहता (शैलेश लोढा) ऑफिसला उशिरा येतो आणि यामुळे त्याचा बॉस (राकेश बेदी) रागावतात. मालिकेत बॉससह त्यांची टंच आणि मादक सेक्रेटरी दाखवली आहे. आणि या पात्राची भूमिका अर्शी भारतीने साकारली आहे. अर्शी भारतीचा लूक अतिशय ग्लॅमरस आहे, जो सीरियलमध्ये बबिताला टक्कर देऊ शकतो.

या लोकप्रिय मालिकेतील निवडीबाबत अर्शी म्हणाली की तिने इतर कलाकारांप्रमाणेच या मालिकेसाठी ऑडिशन दिले. काही आठवड्यांनंतर तिला कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला आणि तिला भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कोणत्या भूमिकेसाठी तिची निवड झाली हे पहिल्यांदा तिलासुद्धा आठवत नव्हते.

मग कास्टिंग डायरेक्टरने सांगितले की तिची ‘तारक मेहता …’ या मालिकेसाठी निवड झाली आहे. अर्शी म्हणाली की ती खूप आनंदी आहे. असे काहीतरी घडेल हे तिला वाटलेही नव्हते. जेव्हा तिने ऑडिशन दिली, तेव्हा तिची निवड होईल याची तिला कल्पनाही नव्हती. अचानक रात्री तिला फोन आला आणि सांगण्यात आले की उद्यापासून तुमचे शूटिंग सुरू होईल. ती या मालिकेच्या सेटवर येईपर्यंत तिला विश्वास बसत नव्हता.

अर्शी म्हणाली की जेव्हा ती सोशल मीडियावर तिच्या पात्राच्या भूमिकेबद्दल कमेंट्स वाचते आणि चाहत्यांकडून तिचे कौतुक केले जाते तेव्हा तिला खूप आनंद होतो. अर्शी यापूर्वी क्रिती सॅननसोबत ‘पानीपत’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती क्रितीच्या मित्राच्या भूमिकेत दिसली होती. अर्शी मूळची झारखंडच्या जमशेदपूरची आहे. अर्शी तिची आई सुनीता भारतीसोबत मुंबईच्या अंधेरीमध्ये राहते. अर्शीचे वडील राजेश भारती ज्योतिषी आहेत.

ते साक्ची, जमशेदपूर येथे राहतात. अर्शीने शालेय शिक्षण जमशेदपूरच्या सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमधून केले. त्यानंतर अर्शी मुंबईत मीडिया आणि कम्युनिकेशनचा अभ्यास करण्यासाठी आली. येथे तिने व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये प्रवेश घेतला. मात्र, वडिलांना अर्शीला पुढील शिक्षण घेऊ द्यायचे नव्हते. अर्शीने जिद्दीने तिच्या वडिलांना राजी केले, की तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची परवानगी द्या.

मग अर्शीच्या वडिलांनी तिला अभिनयशाळेत प्रवेश घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर अर्शीने मुंबईतील किशोर नमित कपूर अभिनय शाळेतून नऊ महिन्यांचा डिप्लोमा कोर्स केला. इथे तिने अभिनयाचे बारकावे शिकले. त्यानंतर अर्शीने बॉलिवूडमध्ये ऑडिशन देण्यास सुरुवात केली. अनेक ऑडिशन दिल्यानंतर अर्शीला ‘पानिपत’ चित्रपटात भूमिका मिळाली.

तर… सध्या, अर्शीला तारक मेहतासाठी निवडण्यात आलेले आहे. सर्व चाहत्यांना आशा आहे की अर्शीची भूमिका दीर्घकाळ टिकेल. आणि ती तिची व्यक्तिरेखा खूप छान साकारेल. अर्शीचे आमच्या स्टार मराठीच्या सर्व टीमकडून खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला आशा आहे की अर्शी बबीताजी आणि दयाबेनची पोकळी तिच्या पात्राने नक्कीच भरून काढेल.