कलेला भाषा नसते असं म्हणतात. त्यातली त्यात सिनेमा तर सगळयांना वेड लावतो. कधी हसवून तर कधी रडवून आपलंसं करून टाकतो. भारतामध्ये सिनेमा आणला तो ही अस्सल मराठमोळ्या दादासाहेब फाळके ह्यांनी. त्यांचाच हा वारसा अनेक मराठी कलाकार आज चालवत आहेत. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, तमिळ, तेलुगू ह्या भाषांमध्येही आपला ठसा उमटवत आहेत. काही तर अगदी हॉलिवूड गाजवत आहेत.

दुर्गाबाई खोटे, रीमा लागू, उषा नाडकर्णी, पद्मिनी कोल्हापुरे, स्मिता पाटील, माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, सोनाली कुलकर्णी, मुग्धा गोडसे ह्या आणि अशा कित्येक मराठमोळ्या मुलींनी भारतातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूड कित्येक वर्षे गाजवलं आहे अजूनही गाजवत आहेत.

त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत नव्या पिढीतील ‘ह्या’ मुलीही फक्त हिंदीच नाही तर इतर भाषांमध्येही आपल्या मराठीचा डंका वाजवत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडं.

श्रुती मराठे : श्रुती मराठेने श्रेयस तळपदे निर्मित ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं. मराठी सोबतच तिने इंदिरा विझा या तमिळ चित्रपटात काम केलं आहे. ह्याशिवाय नान अवनीलाई २, गुरू सिष्यान, तीचा बाप त्याचा बाप यासारख्या चित्रपटांत ती दिसून आली. चित्रपटसोबतच राधा हि बावरी, जागो मोहन प्यारे ह्या मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘रिमेम्बर अमनेशिया’ ह्या हॉलिवूड चित्रपटात श्रुतीने मुख्य भूमिका साकारली आहे.

राधिका आपटे : ओटीटी किंवा नेटफ्लिक्सची नायिका म्हणून राधिका तरुणांमध्ये प्रसिद्ध आहे. राधिकाने ‘घो मला असला हवा’ ह्या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ती रितेश देशमुखसोबत लय भारी ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली.  राधिकाने मराठी, हिंदी,  तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली भाषेतदेखील काम केलं आहे. हिंदी मधील शोर इन द सिटी, आय ऍम, पॅडमॅन,  पार्चड् हे तिचे काही गाजलेले चित्रपट.

चित्रपट आणि नाटकाशिवाय राधिकाने नेटफ्लिक्स सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील काम केले आहे. ती सेक्रेड गेम्स, घोल, लस्ट स्टोरीज सारख्या वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. चित्रपट, नाटक आणि वेब सिरीजमधील तिच्या कामाने बॉलिवूडमधील सध्याच्या अव्वल आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत राधिकाचं नावं येतं.

अमृता खानविलकर : ‘वाजले की बारा’ म्हणत घराघरात पोहोचलेल्या अमृताने 2006 साली गोलमाल ह्या मराठी चित्रपटातून पदार्पण केले. उत्तम नृत्यांगना असणारी अमृता नटरंग, चोरीचा मामला, साडे माडे तीन ह्या मराठी चित्रपटांसह फुंक, राझी, 24:इंडिया आणि डिलिनव्हंट डान्सर्स ह्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

अमृता सुभाष : वळू, झिपऱ्या, गंध, त्या रात्री पाऊस होता,  अस्तु, मसाला ह्या गाजलेल्या चित्रपटातून दिसून आलेली अमृता नुकतीच झोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय ह्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. गली बॉय मधील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार ही मिळाला आहे.

विभावरी देशपांडे : ‘श्वास’ ह्या चित्रपटातून विभावरीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, सातच्या आत घरात, देऊळबंद, चिंटू, चिंटू 2 मधून दिसून आलेली विभावरी उत्तम अभिनेत्री तर आहेच पण एक उत्तम लेखिका ही आहे. अलीकडेच तिने टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब,  सेक्रेड गेम्स, सिटी ऑफ ड्रीम्स, सेक्शन 375 आणि कमांडो 3 ह्या हिंदी चित्रपट आणि वेब सिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.