मित्रांनो!, आपले स्वतःचे हक्काचे एक घर असावे, असे आपल्यापैकी प्रत्येकाचेच स्वप्नं असते. मोठ्या कष्टानं बांधलेल्या घरांना नाव देताना माणसांमधील संवदेनशीलता आणि प्रतिभाही पणाला लागते. ग्रामीण भागात शक्यतो मुलांची, आई-वडिलांची अगर देवांची नावं घरांना देण्याची पद्धत आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या बंगल्याला ‘८६०३२ ची कृपा’ असं नाव दिलं. हे एका उसाच्या जातीचं नाव आहे. याची माहिती मिळाल्यानंतर उसाच्या या जातीचा शोध लावणाऱ्या राहुरी कृषी विद्यापाठातील शास्त्रज्ञांनी त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन सन्मान केला.

चोराडी, ता. खटाव, जि. सातारा येथील बापू आण्णा पिसाळ यांनी आपल्या बंगल्याला हे नाव दिलं आहे. बंगल्याची रंगरंगोटी करताना उसाचं चित्रही रेखाटलं आहे. उसाच्या या जातीची लागवड केल्यानं उत्पन्न वाढलं. त्यातूनच आपली भरभराट झाली, त्यामुळं याच पैशातून बांधलेल्या घराला त्याच उसाचं नाव दिलं, असं पिसाळ यांचं म्हणनं आहे. त्यांचा हा बंगला सातारा जिल्ह्यात तर चर्चेचा ठरला आहेच, पण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यपाठीनंही त्यांची दखल घेतली.

उसाची ही जात शोधून काढणाऱ्या विद्यापीठाच्या पाडेगाव येथील संशोशन केंद्रातील शास्त्रज्ञांनी घरी जाऊन पिसाळ यांचा सन्मान केला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या संशोधन केंद्रानं १९९६ मध्ये उसाची को ८६०३२ ही जात विकसित केली आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात तिन्ही हंगामासाठी या जातीची शिफारस करण्यात आलेली आहे. चांगलं उत्पन्न देणारी जात म्हणून शेतकऱ्यांमध्ये ती लोकप्रीय आहे. या उसाच्या वाणास या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

त्याच दरम्यान साताऱ्यातील पिसाळ यांनी बंगल्याला हे नाव दिलं आहे. पिसाळ याच उसाची लागवड करतात. त्यातून त्यांची आर्थिक प्रगती होत गेली. अलीकडेच त्यांनी जुन्या घराच्या जागी ११०० चौसर फुटांचा नवा बंगला बांधला आहे. त्यामुळं उसाच्या या वाणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी बंगल्याला हे नाव दिलं आहे. याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ व पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त केलं. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील व संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. अशोक फरांदे यांनी पिसाळ यांचे आभार व्यक्त केले.

अशा शेतकऱ्याचा सन्मान करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर व त्यांच्या समवेत या केंद्रातील शास्त्रज्ञांनी पिसाळ यांच्या घरी भेट दिली. त्यांचा फेटा बांधून, श्रीफळ व ऊस मार्गदर्शन पुस्तिका तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठाची कृषी दैनंदिनी देऊन सन्मानित केलं. यावेळी अन्य शेतकरीही उपस्थित होते. उसाचे व्यवस्थापन आणि अधिकाधिक उत्पादन कसे घेता येईल, याबद्दल शास्त्रांज्ञांनी मार्गदर्शन केलं.