मुव्ही रिव्ह्यू: ‘वॄंदावन’ मराठी पाकीटात दाक्षिणात्य माल
अलिकडे मराठीतीत अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक बघायला मिळत आहेत. पण या सिनेमांची काही खिचडी या सिनेमांच्या दिग्दर्शकांना निट बनवता आलेली बघायला मिळत नाही.
अलिकडे मराठीतीत अनेक दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक बघायला मिळत आहेत. पण या सिनेमांची काही खिचडी या सिनेमांच्या दिग्दर्शकांना निट बनवता आलेली बघायला मिळत नाही. एका भाषेतून दुस-या भाषेत जेव्हा एखादा सिनेमा रिमेक केला जातो तेव्हा फक्त भाषाच बदलून चालत नाही, त्या भाषेचा प्रेक्षकवर्ग कसा आहे याचाही विचार करणे महत्वाचे आहे. ‘वृंदावन’ हा २०१० साली आलेल्या ‘ब्रिंदावन’ या एन टी रामा राव ज्युनिअर या अभिनेत्याच्या गाजलेल्या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमाने साऊथमध्ये चांगलीच कमाई केली होती. पण या सिनेमाचा मराठीत रिमेक करताना बरीच गडबड झाली आहे. हा सिनेमा बघताना मराठी भाषा कानावर पडते, पडद्या मराठी कलाकार दिसतात पण बाकी सगळं एखाद्या दाक्षिणात्य सिनेमाप्रमाणेच बघायला मिळतं. याचा परिणाम असा होतो की, आपण मराठी सिनेमा बघत आहोत असे वाटतच नाही. सतत साऊथच्या सिनेमांची आठवण येत राहते. त्यामुळे रसभंग झाल्यासारखा वाटतो. तुम्ही सिनेमाशी कनेक्ट होऊ शकत नाही.
सिनेमाची कथा सुरू होते ती मुंबईतून….क्रिश हा एका मोठ्या बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा. त्याचं एका तरूणीवर प्रेम आहे. क्रिश हा स्वभावाने चांगला आणि कुणालाही मदत करणारा आहे. त्याच्या प्रेयसीची एक मैत्रीण अडचणीत असते. तिला शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं असतं पण गावातील तिच्या वडीलांनी तिचं लग्न गावातील एका गुंडाशी जुळवलेलं असतं. पण तिचं एका दुस-याच मुलावर प्रेम असल्याचं तिचे आजोबा मुलीच्या वडीलाला सांगतात. पण मुळात तिला बॉयफ्रेन्ड नसतोच. मग क्रिशला त्याची प्रेयसी तिच्या मैत्रीणीचा खोटा खोटा बॉयफ्रेन्ड म्हणून गावात पाठवते. गावात गेल्यावर तिथे दोन सावत्र भावांची दुश्मनी बघायला मिळते. मग क्रिश त्यांचं भांडण मिटवतो. त्यानंतर या सिनेमात एकापाठी एक टिपीकल असे ट्विस्ट येत जातात आणि ते रटाळ होत जातात. आणि दिग्दर्शनाने सिनेमाच्या शेवटी सांगितले की या सिनेमाचा दुसराही भाग येणार
साउथचे प्रसिद्ध दिग्दर्शक टीलव्ही प्रसाद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. पण त्यांनी या रिमेकचं दिग्दर्शन करताना बहुदा हे विसरले असावे की ते मराठी सिनेमा करत आहेत. कारण हा सिनेमा भाषा आणि कलाकार सोडले तर पूर्णपणे साऊथ सिनेमा आहे. या सिनेमासाठी वापरण्यात आलेले अनेक लोकेशनही महाराष्ट्रातले नाहीयेत. दिग्दर्शकांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी मराठे प्रेक्षकांचा जराही विचार केलेला नाहीये. एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे या सिनेमाची स्टारकास्ट. या सिनेमात अनेक दिग्गज आणि लोकप्रिय चेहरे आहेत. पण फक्त मोठे कलाकार घेतले आणि पडद्यावर काहीही दाखवलं तर लोकं बघतील हे गॄहीत धरून चालणार नाही.
सिनेमाची कथा फारच रटाळ आणि उगाच लांबल्यासारखी वाटते. एकापाठी एक येणारे ट्विस्ट सिनेमाला रटाळ आणि स्लो करतात. भलेही सिनेमा चकाचक दिसतो पण कथेशी, संवादाशी तुम्ही जराही कनेक्ट होता येत नाही. डायलॉग्सही हास्यास्पद झाले आहेत. गाणी जरा बरी झाली आहेत. अभिनेता राकेश बापट हा एक दमदार अॅक्शन हिरो म्हणून समोर आला आहे. हिरोईझम असलेला तो एक परफेक्ट कलाकार आहे. त्याने चांगलं काम केलंय. पूजा सावंत, वैदेही परसूरामी, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे, अशोक सराफ यांचीही कामे चांगली झालीत. पण फक्त कलाकारांनी चांगले काम करून सिनेमा चांगला होत नसतो. त्यासाठी सर्वच गोष्टी जुळून याव्या लागतात. जे या सिनेमात बघायला मिळत नाही. सिनेमात दाखवण्यात आलेली कॉमेडीही खूप ओव्हरडोझ होते.
एकंदर काय तर दिग्दर्शकाने या फोडणीच्या खिचडीसाठी पाकीट वेगळं वापरलं असलं तरी त्यात माल मात्र साऊथचाच आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या फोडणीच्य खिचडीत मसाला अतिजास्त टाकल्याने ती पचणीच पडत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या रिस्कवर हा सिनेमा बघायला असेल तर बघु शकता. सोबतच जर तुम्ही साऊथ सिनेमाचे चाहते असाल तर तुम्ही हा सिनेमा एकदा पाहू शकता.