‘चला हवा येऊ द्या’मध्ये किंग खानचा भाऊसोबत लुंगी डान्स

तो येणार तो येणार अशी चर्चा सर्वत्र होती.. त्याच्या येण्याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आणि कुतुहल जागं झालं होतं.. आणि तो आला, त्याने पाहिलं आणि त्याच्या आजवरच्या लौकिकाप्रमाणेच त्याने सारं काही जिंकूनही घेतलं..

shahrukh bhaukadam

 

तो येणार तो येणार अशी चर्चा सर्वत्र होती.. त्याच्या येण्याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आणि कुतुहल जागं झालं होतं.. आणि तो आला, त्याने पाहिलं आणि त्याच्या आजवरच्या लौकिकाप्रमाणेच त्याने सारं काही जिंकूनही घेतलं.. तो म्हणजे बॉलीवुडचा किंग शाहरूख खान. आपल्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने शाहरूखने हजेरी लावली झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात.

या चित्रपटाच्या निमित्ताने थुकरटवाडीत आलेल्या शाहरूखने उपस्थितांची मने तर जिंकलीच आणि सोबतच यातील कलाकारांनी केलेल्या धम्माल विनोदाने शाहरूखही या सर्वांचा ‘फॅन’ झाला. येत्या सोमवारी ११ एप्रिल रोजी रात्री ९.३० वा. झी मराठीवरून ही सर्व धम्माल प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे ‘चला हवा येऊ द्या’ च्या ह्या विशेष १७५ व्या भागामधून

 

चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर आजवर मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. महाराष्ट्र दौ-यामुळे तर हा कार्यक्रम गावागावांत आणि घराघरांत पोहोचला. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांमध्येच या कार्यक्रमात या आठवड्यात काय घडणार, कोणते पाहूणे येणार, यातील कलाकार काय धम्माल करणार याबद्दल कमालीची उत्सुकता असते. महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय असलेल्या या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेची चर्चा बॉलीवुडच्या कानावर पडली नसती तरच नवल. यातूनच बॉलिवुडच्या मंडळींनीही या कार्यक्रमात सहभागी होण्याविषयी उत्सुकता दाखवली.

आजवर या कार्यक्रमात रितेश देशमुख, सोनम कपूर, जॉन अब्राहम आदी बॉलिवुड मंडळींनी हजेरी लावून थुकरटवाडीच्या मंडळींसोबत धम्माल उडवून दिली होती. या पंक्तीत आता बॉलिवुडच्या किंग खानचाही समावेश झाला आहे. आपल्या फॅन चित्रपटाच्या निमित्ताने शाहरूख या कार्यक्रमात सहभागी झाला आणि तो या सर्व कलाकारांची अदाकारी बघून त्यांचा फॅन झाला. यावेळी शाहरूखचे अगदी मराठमोळ्या पद्धतीने फेटा बांधून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले याशिवाय त्याच्या हस्ते गुढीही उभारण्यात आली.

डीडीएलजेची धम्माल आणि सीआयडीसोबत लुंगी डान्स
लोकप्रियतेचे सर्व विक्रम मोडणारी प्रेमकथा असं वर्णन ज्या चित्रपटाचं करण्यात येतं तो म्हणजे शाहरूख खानचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. या चित्रपटातील शेवटच्या दृश्यावर थुकरटवाडीतील मंडळींनी तुफान स्किट सादर केलं जे बघून शाहरूखचीही हसून हसून पुरेवाट लागली. यात सागर कारंडे काजोल तर कुशल बद्रिके शाहरूख बनला होता, अमरीश पुरीच्या भूमिकेत भारत गणेशपुरे तर फरीदा जलालच्या भूमिकेत श्रेया बुगडे होती आणि या सर्व दृश्याचा विचका करणा-याच्या भूमिकेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून भाऊ कदम होता. यासर्वांनी यावेळी एकच धम्माल उडवून दिली. यासोबतच सीआयडी कुशल बद्रिके आणि दया झालेला भाऊ कदम यांनी शाहरूखला अटक करण्याच्या निमित्ताने केलेले विविध प्रयोग यानेही कार्यक्रमात हास्याचे विविध रंग भरले.

शाहरूख जेव्हा भावनिक होतो…
या कार्यक्रमात शाहरूखचा दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतचा आणि फौजी मालिकेपासून ते सुपरस्टार बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास एका अनोख्या पद्धतीने दाखविण्यात आला जो बघून शाहरूखही भावूक झाला. कामाच्या या धावपळीत, धकाधकीत या गोष्टींचा कुठे तरी विसर पडला होता परंतु तुम्हा सर्वांमुळे मला माझ्या सुरूवातीच्या प्रवासाची, संघर्षाची गोष्ट पुन्हा एकदा बघायला मिळाली त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा खुप खुप आभारी आहे. या क्षणाला मी खुप भावनिक झालो असून या भावना शब्दांत व्यक्त करणं खरच कठीण आहे असं मतही त्याने व्यक्त केलं. एकंदरीतच शाहरूख खानचा सहभाग असलेला हा चला हवा येऊ द्या चा धम्माल १७५ वा भाग येत्या सोमवारी म्हणजेच ११ एप्रिलला रात्री ९.३० वा. प्रेक्षकांना बघता येईल फक्त झी मराठीवरून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here