आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी दहा मराठी चित्रपटांची निवड
47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (IFFI) यंदा 10 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सैराट, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट या यावर्षातील सुपरहिट सिनेमांचा समावेश आहे.
गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे. या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे 10 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाठी शासनाकडून 9 चित्रपटांची निवड करण्यात आली होती.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समावेशासाठी आलेल्या 27 चित्रपटांचं परिक्षण केल्यानंतर शासनाने नेमलेल्या समितीने 10 मराठी चित्रपटांची निवड केली. मराठी चित्रपटांमधील कलाकृतीला दर्जेदार आणि उत्तम व्यासपीठ मिळावे या दृष्टीकोनातून गेल्यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचा समावेश केला जातो. कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही 3 मराठी चित्रपट राज्य सरकारच्या वतीने पाठविण्यात आले होते.