सर्व नियम आणि अटींचं पालन करून जवळपास ३ महिन्यांच्या मोठ्या ब्रेक नंतर मालिकांच्या सेटवर शूटिंगची लगबग सुरु झाली आणि बघता बघता सर्व मालिकांचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस आले. झी युवा वरील लोकप्रिय मालिका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेचे नवीन भाग १३ जुलै पासून वाहिनी सादर करतेय.
या मालिकेचे कलाकार आणि संपूर्ण टीम सेटवर पूर्ण खबरदारी घेऊन नियमांच्या चौकटीत राहून चित्रीकरण करत आहेत. तसेच कमी लोकांसोबत योग्य ती सावधानता बाळगत मालिकेचं शूटिंग होतंय. परंतु अनलॉकनंतर शूटिंग करताना या सेटवर कलाकारांना सर्वात मोठा बदल स्वीकारावा लागला तो म्हणजे मेकअप आर्टिस्ट्सची अनुपस्थिती. हो हे खरंय! ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या सेटवर सर्व कलाकार स्वतःचा मेकअप स्वतः करत आहेत.
हे खरतर कलाकारांसाठी एक आव्हानच म्हणावं लागेल. पण स्वतःचा मेकअप स्वतः करताना सेटवरील सर्व कलाकारांची काय तारांबळ उडते हे सांगताना अभिनेत्री गौरी कुलकर्णी म्हणाली, “३ महिन्यांनंतर ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच शूट सुरु झालंय आणि हे शूटिंग करताना आम्ही खूप काळजी घेतोय.
सेटवर सगळ्याच गोष्टींची काळजी घेतोय आणि त्यामुळे सध्या आम्ही स्वतःचा मेकअप आणि हेअर स्वतः करतोय. आम्हाला सांगण्यात आलं होतं कि सगळ्यांना स्वतःचा मेकअप स्वतः करावा लागेल. रेग्युलर मेकअप आणि स्क्रिनवरती दिसण्यासाठी करण्यात येणारा मेकअप यात खूप फरक असतो.
त्यामुळे आम्हाला हा मेकअप करण्याचा फारसा अनुभव नव्हता. शूटिंगचे पहिले दोन दिवस मेकअप आणि हेअर आर्टिस्ट्सनी येऊन आम्हाला गाईड केलं. त्यांनी आम्हाला आमच्या स्किनटोन नुसार कुठले मेकअपचे शेड्स वापरायचे ते सांगितले. प्रत्येकाला वेगवेगळे स्पॉंज, पफ्स दिले.
मी माझ्या घरून माझं बहुतेक मेकअपच सामान आणलं आहे. त्यामुळे मी माझा मेकअप करताना माझंच सामान वापरतेय. हा एक खूप छान आणि वेगळा अनुभव आहे. सुरुवातीला खूप अवघड गेलं करणं सवय नव्हती. मला मेकअप मधलं काहीच येत नव्हतं, पण आता मला हळूहळू बऱ्यापैकी मेकअप जमतेय असं मी म्हणू शकते. मी माझा मेकअप केल्यावर मला बाकीचे सहकलाकार त्यावर प्रतिक्रिया पण देतात, कधी काही कमी जास्त झालं तर सांगतात.”
मेकअप स्वतःच करण्याचं आव्हान कलाकारांनी लीलया पेलल्यामुळे त्यांची मेकअप करण्याची कला देखील सुफळ संपूर्ण झाली आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.