दर्जेदार मालिकांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करणारी, ‘झी युवा’ ही मराठी वाहिनी, इतर अनेक खास उपक्रमांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांसाठी व चाहत्यांसाठी वेगळं आणि खास असं काहीतरी ‘झी युवा’ नेहमीच घेऊन येत असते. अशाच एका निराळ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून, सिद्धिविनायक प्रतिष्ठान आयोजित ‘झी युवा दांडिया २०१९’मध्ये ‘झी युवा’चे कलाकार सहभागी झाले होते. ठाण्यात रंगलेल्या या दांडिया नाईटमध्ये उत्साही तरुणांच्या बरोबरीने, ‘झी युवा’ वाहिनीवरील मालिकांमधील सर्व मुख्य कलाकारांनी भाग घेतला होता. नवरात्रीच्या उत्सवात, सर्वच कलाकार वेळात वेळ काढून, गरबा खेळण्यासाठी जातात. ‘झी युवा’ वाहिनीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांमधील कलाकारांना, यंदा वाहिनीनेच ही संधी उपलब्ध करून दिली. ठाण्याच्या ‘सिद्धिविनायक प्रतिष्ठान’तर्फे आयोजित दांडिया नाईटमध्ये ‘फुलपाखरू’ मालिकेतील यशोमन आणि ऋता द , ‘तू अशी जवळी रहा’ मालिकेतील सिद्धार्थ आणि तितिक्षा, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतील गौरी आणि निखिल व ‘साजणा’ मालिकेतील पूजा आणि अभिजित ही कलाकार मंडळी उपस्थित होती. याशिवाय वाहिनीवर लवकरच सर्वांच्या भेटीला येत असलेल्या ‘प्रेम पॉयजन पंगा’ या मालिकेतील मुख्य कलाकार करण बेंद्रे आणि शरयू सोनावणे हे सुद्धा सहभागी झाले होते. या कलाकारांना भेटण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून रसिक चाहते आले होते.
आपल्या आवडत्या कलाकारांना गरबा खेळताना पाहून, उपस्थित असलेली सर्वच मंडळी खूप खुश झाली. कलाकारांसह सेल्फी काढण्याचा मोह सुद्धा अनेकांना आवरला नाही. आपल्या चाहत्यांचे प्रेम बघून, या कलाकारांनी सुद्धा त्यांच्यासह फोटो काढण्यात उत्साह दाखवला. रसिकांसह गरब्याचा आनंद लुटून झाल्यावर, देवीचे दर्शन घेऊन, या कलाकारांनी सर्वांचे आभार मानले. रोज टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना, प्रत्यक्षात गरबा खेळताना पाहणे, ही चाहत्यांसाठी मोठीच पर्वणी ठरली.