फुलपाखरू मालिका आणि या मालिकेचे फॅन्स दिवसेंगणिक वाढतच आहेत. या मालिकेच्या गोष्टीने आजवर अनेक वळणं घेतली. मानस आणि वैदेही च्या महाविद्यालयीन प्रेमकथेने सुरु झालेली फुलपाखरू या मालिकेची कथा, असंख्य तरुण तरुणीच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब ठरली. मानस मध्ये मुलींना त्यांच्या मनातील प्रियकर तर वैदेही मध्ये मुलांना त्यांची ड्रिमगर्ल दिसली. त्यांनतर यामालिकेतील वेगवेगळे ट्विस्ट आणि टर्न हे प्रेक्षकांना या मालिकेशी घट्ट जोडण्यात यशस्वी ठरले.
प्रेम, ईर्षा, दोस्ती , शत्रू , किशोरवयीन गर्भधारणा , त्यांनतरची मानसिकता , लग्न , बाळंतपण असा अनेक आजच्या तरुणांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या विषयाला हात घालत मानस आणि वैदेही ची जोडी त्यांच्या आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक तरुणाने स्वतःच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीला कसे प्राधान्य दिले पाहिजे या गोष्टीवर मानस आणि वैदेही आता फुलपाखरूची गोष्ट पुढे नेतील. या गोष्टीचा एक भाग म्हणजेच मानस च्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा कलाकारांच्या मांदियाळीत अगदीच दणक्यात साजरा झाला. मंगळवार दिनांक १९ मार्च ला रात्री ८:३० वाजता फुलपाखरू मालिकेचा विशेष भाग पाहायला मिळेल.
मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी प्रेक्षकांसाठी हा अशा आगळ्यावेगळ्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले . त्यांच्याबरोबर आजपर्यंत विविध मालिकांमध्ये काम केलेली ही कलाकार मंडळी मंदार देवस्थळीच्या प्रेमापोटी एकही पैसा न घेता विशेष भागात सहभागी झाली .मराठी टीव्ही आणि चित्रपट मधील आघाडीच्या कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींनी या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याला मानस ला सपोर्ट करण्यासाठी वैदेही च्या आग्रहाखातर उपस्थिती दर्शवली आणि मानसला त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या . या विशेष भागात प्रेक्षकांना अनेक नामवंत चेहेरे पाहायला मिळणार आहेत.
रोहिणी हट्टंगडी, उमेश कामत, वैभव मांगले, संजय जाधव , अतुल परचुरे , सुप्रिया पाठारे , सुचिता थत्ते , लीना भागवत , मुग्धा गोडबोले , आणि त्याचबरोबर सूर राहू दे मालिकेतील संग्राम साळवी , नक्षत्रा मेढेकर , प्रिया मराठे , उदय सबनीस हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते . श्रेयश तळपदे याने व्हिडिओ वरून मानस ला शुभेच्छा दिल्या. “ओढ तुझी ‘असे या कविता संग्रहाचे नाव ठेवले असून याचे प्रकाशन या सर्व नामवंत लोकांच्या हस्ते मालिकेमधील या विशेष भागामध्ये झाले आहे. या पुढे फुलपाखरूची कथा आता कोणते वळण घेईल हे पाहण्यासाठी उत्कंठा वाढवणारे असून ही कथा पाहत राहा सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ८:३० वाजता फक्त झी युवावर .