बाप्पाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच लागून राहिलेली असते. हीच आतुरता झी टॉकीज या मराठी वाहिनीच्या मंचावर सुद्धा होती. आनंद आणि उत्साहाचा हा उत्सव, झी टॉकीजने यावर्षी निराळ्या पद्धतीने व दणक्यात साजरा केला. विविध गणपती मंडळांचे सार्वजनिक गणपती, बाप्पाची आरास, सुंदर मूर्ती या सर्वांच्या सानिध्यात संपूर्ण महानगर आनंदाच्या वातावरणात मग्न झालेले असते. सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरणाचा परिणाम सर्वत्र दिसून येतो. अशा या मंगलमय काळात, यंदा झी टॉकीजने अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. गणेशाचे ४०×२० फूट मापाचे एक थ्रीडी होर्डिंग तयार करण्यात आले होते. ‘अलख’ या जाहिरात कंपनीने या भव्य होर्डिंगसाठी बांद्रा येथे ही जागा उपलब्ध करून दिली आहे. ‘टॉकीज गणपती’ दिमाखदार पद्धतीने नटलेला होता.
विनोदी क्षेत्रातील दमदार अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्या उपस्थितीत बाप्पाचे आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहाने सर्वांनी बाप्पाचे स्वागत केले. बाप्पाची पूजा व आरती यात सहभागी होत हा उत्साह अनेक जणांनी अनुभवला. या उपक्रमाविषयी बोलताना अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाली;’टॉकीज बाप्पा’ या उपक्रमात सहभागी होण्याविषयी कळलं, तेव्हा मनात थोडीशी धाकधूक होती. पण, बाप्पाच्या थ्रीडी होर्डिंगजवळ पोचले आणि ही धाकधूक उत्साहात बदलून गेली. ‘झी टॉकीज’च्या प्रत्येक उपक्रमाचा भाग होता येईल असा माझा प्रयत्न असतो.
बाप्पाची पूजा व आरती अनेकदा केली आहे. आज थ्रीडी रूपातील गणेशाची आरती करण्याची संधी मिळाली. हा अनुभव माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. झी टॉकीज हे एक मोठं कुटुंब आहे. हे कुटुंब नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतं. वाहिनीने साकारलेला थ्रीडी बाप्पा हा असाच एक छान उपक्रम आहे.