गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा मोठा सोहळा असतो. १० दिवस आवल्या घरी असलेले बाप्पाचे वास्तव्य मनाला सुखावणारे ठरते. बाप्पाचा हा सण जवळ आलेला असतांना, सर्वजण त्याच्या स्वागताचा तयारीला लागलेले आहेत. ‘झी युवा’ या मराठी वाहिनीने सुद्धा युवा गणेशोत्सवाचे आयोजन करून, मालिकेच्या सेटवर हा आनंद साजरा केला.

बाप्पाच्या आगमनाची आतुरता सगळ्यांच्याच मनात असते. ‘फुलपाखरू’ या मालिकेच्या सेटवर यंदा बाप्पाचे आगमन झाले व गणेशोत्सवाचा माहोल सेटवर सुद्धा निर्माण झाला. गणेशाचे स्वागत करण्यासाठी ‘फुलपाखरू’ मालिकेची संपूर्ण टीम तर उपस्थित होतीच; शिवाय इतर मालिकेतील कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ मालिकेतील निखिल दामले व गौरी कुलकर्णी, ‘तू अशी जवळी राहा’ची मुख्य अभिनेत्री तितिक्षा तावडे हे कलाकार सुद्धा युवा गणेशोत्सवात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील संस्कृतीचा सन्मान करून, सर्व कलाकारांनी परंपारिक वेशभूषा केलेली होती. ढोलताशांच्या गजरात नाचून व आनंद साजरा करून बाप्पाचे स्वागत केले गेले. यशोमन, तितिक्षा आणि निखिल यांनी स्वतः ढोल सुद्धा वाजवले.

यशोमन आणि निखिलने लयीत ढोल वाजवत सगळ्यांची मने जिंकली. पहिल्यांदाच ढोल वाजवण्याचा अनुभव घेत, तितिक्षाने सुद्धा खूप मजा केली. घरापासून दूर राहत असलेल्या व चित्रीकरणाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे घरी जाऊ न शकणाऱ्या कलाकारांना, घरातील वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी, ‘झी युवा’ने हा गणेशोत्सव साजरा करून दिली. सर्वांनीच या गणेशोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला.