उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायिका असणारी सावनी शेंडे, ‘युवा सिंगर एक नंबर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून परीक्षक म्हणून पदार्पण करणार आहे. बुधवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा कार्यक्रम आणि सावनीच्या ‘परीक्षक’ या नव्या भूमिकेबद्दल जाणून घेण्यासाठी सावनी सोबत साधलेला हा खास संवाद
१. परीक्षकाची भूमिका निभावताना कसं वाटतंय?
महाराष्ट्रातील विविध भागातील मुलांच्या गाण्याचं कौशल्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे परीक्षक म्हणून काम करायला नक्कीच आवडतंय. एखादा स्पर्धक चुकत असेल, तर त्याला मार्गदर्शन करता येतं. हा नवा अनुभव घ्यायला मजा येतेय. ‘झी युवा’सारख्या मोठ्या वाहिनीवर हे काम करायची संधी मिळणं, इतक्या मोठ्या माध्यमातून माझे विचार लोकांपर्यंत पोहचणं, हे जास्त महत्त्वाचं वाटतं.
२. तुमच्यासाठी परीक्षणाचे पैलू काय असतील?
‘स्पर्धक किती सुरेल आहे’ हा मुद्दा सर्वप्रथम समोर असेल. याशिवाय ताल सुद्धा महत्त्वाचा आहेच. गाण्यातील भाव व गाण्याची एकूण समज किती आहे, हे सुद्धा लक्षात घेणे सुद्धा आवश्यक आहे. ‘मी एक उत्तम गायक आहे व या मंचाचा वापर करायला आलो आहे’ असं मानणाऱ्या स्पर्धकापेक्षा, नवं काहीतरी शिकण्याच्या भावनेने आलेला स्पर्धक मला अधिक आवडेल.
३. स्पर्धकांमध्ये कुठला एक्स फॅक्टर शोधायचा प्रयत्न तुम्ही कराल?
स्पर्धकांचे सादरीकरण हाच त्याचा ‘एक्स फॅक्टर’ ठरतो. सूर आणि ताल यांची जाण अनेकांना असते. पण, आपल्याला गाण्यातून जो आनंद मिळतो, तो इतरांपर्यंत पोचवण्याची जिद्द आणि आत्मीयता हा त्या स्पर्धकाचा ‘एक्स फॅक्टर’ ठरेल.
४. तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण आहे?
कुणी एकच गायक किंवा गायिका निवडणं खरंच कठीण आहे. तरीही भीमसेन जोशी व पंडित जसराज अशा व्यक्तींचे आम्ही भक्त आहोत. किशोरी ताई, डॉ. प्रभा अत्रे, वीणा ताई अशीही अनेक नावं घेता येतील. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त म्हणायचं झालं तर, लता दीदी, आशा भोसले, किशोरदा, मोहम्मद रफी अशा गायकांची गायकी शास्त्रीय संगीतात सुद्धा आत्मसात करावीशी वाटते. त्यामुळे हेदेखील माझे आदर्श आहेत.
५. तुमची झालेली प्रशंसा किंवा एखादी कौतुकाची थाप, जी तुम्हाला कायम स्मरणात राहील.
अनेक दिग्गज आणि गुरुजनांचे आशीर्वाद मला लाभले आहेत, हे माझं भाग्य आहे. एकदा भीमसेन जोशींकडे गेलेले असतांना अचानक त्यांनी मला गाणं पेश करायला सांगितलं. माझी स्वरचित बंदिश मी त्यांच्यासमोर सादर केली. ‘तू याच वाटेवर चालत रहा, चांगली झाली आहे बंदिश’ अशी त्यांची मिळालेली दाद फार महत्त्वाची होती. माझ्या स्वरचित रागांमधील बंदिशींच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला पंडित जसराज आले होते. ‘तुमने कुछ नया किया हैं, वह बोहोत अच्छा होगा सावनी’ हे कौतुकाचं वाक्य त्यांच्याकडून ऐकताना समाधान वाटलं होतं. अशा दिग्गजांकडून ही पावती मिळणं ही भावना नेहमीच छान असते.