संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा भाऊ कदम म्हणजे कॉमेडीचं खणखणीत नाणं. छोटया पडद्याच्या रुपात आलेलं हे पैसा वसूल नाणं आता रुपेरी पडद्यावर ते ही मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमात भाऊ कदम रुपेरी पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे.

ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके पॅटर्न या तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ म्हणजे विनोदाचा हैदोस असणार आहे. सिनेमाची कथा डॉ.रणजित सत्रे यांची असून पटकथा डॉ.प्रसन्न देवचके यांची आहे. चित्रपटात चार गाणी असून चित्रपटाला अशोक वायंगणकर यांचे संगीत लाभले आहे. तर गीतकार मोमीन कवठेकर आहेत.

सिनेमाचे संपूर्ण शुटींग हे अहमदनगर जिल्ह्यातील छोट्या छोट्या गावांमध्ये झाले आहे. चित्रपटाचे नाव जितके कॉमेडी आहे तितकीच ह्या चित्रपटाची स्टारकास्ट देखील कॉमेडी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत भाऊ कदम सोबत शितल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर सोबत पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे सहकलाकार म्हणून आपल्याला दिसणार आहेत.
अस्सल गावरण मेवा आणि विनोदाचा ठेवा असा हा ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.