लहानग्यांच्या होड्यांना वाहून नेणारा खोडकर पाऊस.. प्रियकर-प्रेयसीच्या आनंदात बरसणारा रिमझिम पाऊस.. शेतकऱ्याला सुखावणारा समाधानकारक पाऊस… तर कधी गरजणारा घाबरवून सोडणारा बेताल पाऊस… अनेकविध रूपांनी सजलेला हा पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. आजही आबालवृद्धांच्या ओठी ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ हे बालगीत रुळताना दिसलं की आपसूकच वातावरण एकदम रम्य होऊन जातं. पावसाच्या अनेकविध रूपांपैकी अशाच एका रूपावर ‘येरे येरे पावसा’ हा आगामी मराठी चित्रपट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
एस.क्यूब फिल्म्स इंडिया एलएलपी निर्मित बटरफ्लाय फिल्म्स (चायना) सहनिर्मित आणि शफक खान’ दिग्दर्शित ‘येरे येरे पावसा’ ह्या चित्रपटाद्वारे पावसाची कुठली बाजू आपल्याला पाहायला मिळणार हे सध्या गुपित आहे. चित्रपटाचा कथाविषय मायबाप प्रेक्षकांसमोर आणण्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांमध्ये उत्कंठा वाढवणारे हे पोस्टर साऱ्यांच्याच पसंतीस पडले आहे. ‘येरे येरे पावसा’ चित्रपटाचे संवाद अभिषेक संतोष जया करगुटकर यांचे आहेत तर ही कथा लिहिली आहे भूषण दळवी आणि शफाक खान यांनी. सुशांत एन.किशोर पवार यांच्या सुमधुर संगीताची साथ या ‘येरे येरे पावसा’ला लाभणार आहे तर मिशन मंगल फेम चंदन अरोरा हे हिंदीतील अनुभवी संकलक या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच मराठीत काम करत आहेत. शिवाय छायांकन योगेश कोळी, कला दिग्दर्शक योगेश एम.इंगळे ही इतर श्रेयनामावली आहे.