१ मे हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या सर्व स्त्री-पुरुष कामगारांच्या सन्मानार्थ या दिवशी सर्व कामगारांना एक दिवसाची सुट्टी दिली जाते. कामगार दिनाबद्दल पुढील बाबी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल.
भारतात साजरा केला जाणारा हा कामगार दिन जगभरातील साधारण ८० देशांमध्येही साजरा केला जातो. जगभरात हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून ओळखला जातो.
भारतात सर्वप्रथम चेन्नईमध्ये १ मे १९२३ रोजी कामगार दिन साजरा करण्यात आला होता. ‘हिंदुस्थान कामगार किसान पक्ष’ ने याची सुरुवात केली होती. या पक्षाचे नेते कॉमरेड सिंगारवेलार यांनी सरकारकडे निवेदन देऊन कामगार दिनाची मागणी केली. त्यावेळी भारतात प्रथमच लाल झेंडा वापरण्यात आला होता व पुढे तीच कामगार संघटनांची ओळख बनली.
१ मे १८८६ रोजी अमेरिकन संघराज्यातील कामगार संघटनेने कामगारांना ८ तासांपेक्षा जास्त काम असू नये या मागणीसाठी बंद पुकारला. त्यानंतर ३ दिवसांनी शिकागोच्या ‘हेमार्केट स्क्वेअर’ मध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यात बरेच नागरिक व पोलिस कर्मचा-यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून पाळला जातो.
देशाच्या आर्थिक-सामाजिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावणा-या सर्व स्त्री-पुरुष कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा व त्यांच्या हक्कांचे जतन व्हावे म्हणून हा दिवस महत्वाचा ठरतो. विविध कामगार संघटना याच दिवशी आपल्या मागण्या सरकारदरबारी ठेवतात व कामगारांच्या एकतेचे महत्व दाखवून देतात.
कामगारांनी केलेल्या मेहनतीची जाणीव व त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.
जोसेफ जॉबर्ट या फ्रेंच तत्ववेत्ता व लेखकाने म्हटलेच आहे,
“Genius begins great works; Labour alone finishes them!”
©Nikita Patharkar