सिद्धार्थचे मराठीत बंगाली रूप
मराठी सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ मेनन आपल्याला आगामी सिनेमात बंगाली बोलताना दिसणार आहे. सिद्धार्थने आपले फिल्मी करिअर सुरु करण्याअगोदर ‘नेव्हर माईंड’ ‘संगीत संशयकल्लोळ’ आणि ‘मानापमान’ या नाटकांमधून रंगभूमीही गाजवली होती. एकुलती एक या सिनेमातून सिद्धार्थने मराठी सिनेसृष्टीत दमदार पदार्पण केले. ‘पोपट’, हॅप्पी जर्नी’ राजवाडे अँड सन्स’ ‘पोश्टर गर्ल २’ यांसारख्या अनेक सिनेमातून आपल्याला त्याच्या अभिनयाचे विविध पैलू पाहायला मिळालेत. जुलै २२ ला प्रदर्शित होणाऱ्या ‘& जरा हटके’ या सिनेमात सिद्धार्थ मेनन याची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे.
दोन पिढयांमधली बदलत जाणारी नात्यांची समीकरणं यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सिद्धार्थने या सिनेमात इंद्रनील सेनगुप्ता यांच्या मुलाची भूमिका केली आहे. सिनेमातल्या दोघांच्याही व्यक्तिरेखा बंगाली असल्यामुळे सिद्धार्थला बंगाली भाषा शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. यासाठी सिद्धार्थने बंगाली भाषेचे व्हिडिओ तसेच पुस्तके वाचली. त्याला ही भाषा समजायला आणि बोलायला सोपी जावी यासाठी इंद्रनील यांनीदेखील खूप मदत केली.
प्रकाश कुंटे दिग्दर्शित आणि मिताली जोशी लिखित या सिनेमात आपल्याला मराठी आणि बंगाली संस्कृतीचा मेळ अनुभवता येणार आहे. सिद्धार्थ आणि इंद्रनीलसोबतच मृणाल कुलकर्णी, शिवानी रांगोळे, सोनाली खरे, स्पृहा जोशी यांच्याही प्रमुख भूमिका या सिनेमात आपल्याला पाहता येणार आहे. इरॉस इंटरनॅशनलच्या क्रिशिका लुल्ला तसेच रवी जाधव या दोघांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणेच सिनेमाचा विषयही हटके असेल हे मात्र नक्की.