पठडीबाहेरील लिखाण करणे खरे चॅलेंजिंग- शिल्पा नवलकर..

टीव्हीवरची मालिका म्हणजे नायिकाप्रधान… या मालिकेत जोपर्यंत नटी रडत नाही तोवर मालिकेचा टीआरपी वाढतच नाही… पण या पठडीत न बसणाऱ्या एका मालिकेचे लिखाण सध्या लेखिका शिल्पा नवलकर करतायत.

स्टार प्रवाहवरच्या ‘गोठ’ मालिकेतील पटकथा कागदावर उतरवताना लेखक म्हणून माझ्यासमोर भले मोठे आव्हान आहे ते म्हणजे टीव्हीवरील आजवरच्या मालिकांच्या परंपरेविरोधात लिहिण्याचे… मालिकांमध्ये सोशिक सून, छळणारी सासू, कारस्थानी बाई सर्रास असते. ही पात्रे जर नसतील तर त्या मालिकेचे दिवस भरलेच म्हणून समजा. पण ‘गोठ’मधील मुख्य स्री पात्र म्हणजे याच्या नेमके उलट आहे. यातील मुख्य पात्र आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडते. कुणी जर आपल्याशी चुकीचे वागत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देणारी स्री ‘गोठ’मध्ये दिसते. त्यामुळे ‘गोठ’चे लिखाण माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे, असे मालिकेच्या लेखिका शिल्पा नवलकर सांगतात.

नाटके लिहिणे, चित्रपटाच्या कथेचे लिखाण हे खूप सोपे म्हणावे लागेल. पण टीव्हीवरचे लिखाण, तेही मालिकेचे… त्या लेखकांचा कस लागलाच म्हणून समजा. कादंबरी, कथा लिहिली तरी त्याला एक विशिष्ट वाचकवर्ग असतो, पण टीव्ही मालिकांचे तसे नाही. तेथे तुम्हाला छोट्या मुलापासून कॉलेज तरुण-तरुणी, नोकरदार , स्री-पुरुष, हाऊसवाईफ ते थेट घरातल्या आजी-आजोबांना पटतील असे विचार, पात्र त्या मालिकेत उभी करायची असतात. शिवाय टीव्ही मालिकांना एपिसोडची डेडलाईन असल्याने तुम्हाला एक एपिसोड वेळीच लिहून द्यावा लागतो, असेही त्या म्हणतात.

सध्याच्या टीव्हीवरच्या ट्रेण्डविषयी बोलताना नवलकर म्हणतात की, आजही हिंदी चॅनेलवर टिपिकल सास-बहूच्या सीरियल्स सुरू आहेत, पण मराठीत वैविध्यपूर्ण मालिका येत आहेत. हे मराठीचे वेगळेपण म्हणावे लागेल. चित्रपटगृहांत किंवा नाटक पाहायला येणारा प्रेक्षक हा पैसे देऊन येत असतो. टीव्ही मालिकांचे तसे नसते. आपण आपली मालिका प्रेक्षकांच्या घरी घेऊन जातो. त्यामुळे सर्वांना आवडेल असे लिखाण करणे ही लेखक म्हणून माझी जबाबदारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here