Manus Ek Maati Marathi Movie Review

 

  • Movie : Manus Ek Mati (2017) | माणूस एक माती !
  • Star Cast : Siddharth Jadhav, Ruchita Jadhav, Ganesh Yadav, Swapnil Rasekar, Vilas Ujawane, Harsha Gupte,Varad chavan
  • Director : Suresh Zade
  • Producer : Sharda Vijaykumar Kharat

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नात्यात कसा विसर पडत चालला आहे हे काय वेगळ सांगायला नको. आजकाल मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात खूप विविधता दिसून येत आहे. आयुष्याच्या वाटेवर अनेक नाती माणूस जोडतो आणि तोडतो देखील..अशाच एका विषयावर आज एक सिनेमा प्रदर्शित झाला आहे तो म्हणजे ‘माणूस एक माती’.

माणूस…चुकतो तो माणूस आणि त्या चुकीतून घडतो तो देखील माणूसच..माणसानं आयुष्यात कितीही प्रगती केली तरी आगतिकता त्याची पाठ सोडत नाही. अशा आगतिकतेतून वाट काढून पुढे जाणं हेच खरं जीवन..

बबनराव देशमुख (गणेश यादव) यांचा मानसपुत्र विजय (सिद्धार्थ जाधव).. विजयला लहानाचे मोठे करण्यात बबनराव यांनी सर्व आयुष्य खर्ची घातले. एक एक पैसा जमा करून त्याला शिकवले, मोठे केले. बबनरावांची पत्नी लक्ष्मी हिनेसुद्धा खांद्याला खांदा लावून त्याला साथ दिली. पण नियतीसमोर कोणाचं काही चालतं का ?

सर्व काही सुरळीत चालू असताना बबनराव आणि लक्ष्मीच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि विजयच्या आयुष्याचा प्रवास एका वेगळ्याच टप्प्यावर अडकतो. या सिनेमातून नात्यांची घालमेल, नात्यात येणारा दुरावा, यासारख्या इतर बाबींवर सिनेमा चित्रीत करण्यात आला आहे.

सिद्धार्थ जाधव आणि गणेश यादव याच्या भूमिका सोडल्यातर बाकी कलाकारांवर थोडी मेहनत घ्यायला हवी होती. रुचिता जाधव, स्वप्नील राजशेखर, हर्षा गुप्ते, डॉ विलास उजवणे, वरद चव्हाण, किशोर महाबोले व जगन्नाथ निवंगुणे हे देखील या सिनेमात आहेत.

चित्रपटातील गाणी प्रशांत हेडाऊ यांनी लिहिली असून चित्रपटाला संगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे. ही श्रवणीय गाणी स्वप्नील बांदोडकर, डॉ नेहा राजपाल, आदर्श शिंदे, बेला शेंडे, शिना अरोरा, पी गणेश यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत.

‘शिवम ऐनटरटेंमेंन्ट इंडिया लिमिटेडच्या’, निर्मातीशारदा विजयकुमार खरात, सह निर्माते डॉ विजयकुमार खरात, दिलीप निंबेकर आणि कार्यकारी निर्माते देवा पांडे हे कायमच आशयघन कलाकृतीला महत्त्व देतात. त्यामुळे ‘माणूस एक माती’ सारख्या प्रगल्भ सामाजिक विषयाला त्यांनी उचलून धरले आणि लेखक-दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी हा विषय अतिशय कल्पकतेनं मांडला आहे. चित्रपटाची कथा सुरेश झाडे यांची असून पटकथा आणि संवाद सुरेश झाडे आणि राजू सपकाळ या द्वयींची आहे.

कुटुंब व्यवस्था, नाते संबंध यांची महती सांगणारा हा चित्रपट म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा एक हृदयस्पर्शी अनुभव असेल.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here